उसर नाक्यावर पोलीस छावणी
। अलिबाग । प्रतिनिधी ।
उसर येथील प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेच्या बाजूने शेतीकडे जाण्याचा मार्ग आहे. मात्र, हा मार्ग बंद करण्याचा घाट प्रशासनाने घातला आहे. त्यामुळे येथील अनेक शेतकर्यांनी त्या विरोधात लढा पुकारला आहे. शेताकडे जाण्याचा मार्ग मोकळा करा, स्थानिकांना रोजगार द्या अशा अनेक मागण्या स्थानिकांकडून करण्यात येत आहे. मात्र त्यांचा हा लढा मोडीत काढण्यासाठी पोलीस बलाचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे मेडिकल कॉलेज पुन्हा एकदा वादाच्या भोवर्यात सापडला असल्याचे चित्र दिसून येत आहे.
उसर येथील 53 एकर गुरचरण जागेमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभे राहणार आहे. या जागेवर प्रशासकीय इमारत आणि 500 खाटांचे रुग्णालय बांधले जाणार आहे.त्यासाठी साडेचारशे कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून पहिल्या टप्प्यातील कामासाठी निधीही उपलब्ध झाला आहे.
महाविद्यालयाची इमारत बांधण्यात येणार्या जागेच्या बाजूने गेल्या अनेक वर्षापासून शेतकर्यांच्या वहिवाटीचा मार्ग आहे. या मार्गातूनच शेतकरी त्यांच्या शेतामध्ये जातात. तसेच आजूबाजूला अनेक घरेदेखील आहेत. मात्र स्थानिकांना विश्वासात न घेता वैद्यकीय महाविद्यालय बांधले जाणार असल्याने उसरसह अनेक गांवातील ग्रामस्थांनी लढा सुरु केला आहे. शेतकर्यांचा परंपरागत असलेला रस्ता अडविल्याने शेतकर्यांची मोठी गैरसोय होऊ लागली आहे. त्या वहिवाटीच्या जागेत कुंपण घालण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे उसरसह आजूबाजूच्या गावांतील ग्रामस्थ व शेतकर्यांनी एकत्र येऊन लढा सुरु केला आहे. स्थानिकांना विश्वासात घेऊन काम करा, रोजगार द्या, शेतावर जाण्याचा मार्ग मोकळा करा अशी मागणी होत आहे. त्यांचा हा लढा मोडीत काढण्यासाठी प्रशासनाने पोलिसांच्या बलाचा वापर केले आहे. वैद्यकीय महाविद्यालयाचे काम सुरु असलेल्या ठिकाणासह उसर नाक्यावर गावाच्या प्रवेशद्वासमोर पोलिसांचा कडेकोट पहारा लावण्यात आला होता.
यावेळी अलिबागचे उपविभागीय पोलीस अधिकारी विनित चौधरी, रेवदंड्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरवले यांच्यासह पोलीस कर्मचारी व एक आरसीपी प्लाटून असे एकूण 40 हून अधिक कर्मचार्यांचा कडेकोट पहारा ठेवण्यात आला होता. सोमवारी सकाळपासून दुपारपर्यंत या परिसरात छावणीचे स्वरूप निर्माण झाले होते. संबंधित विभागाचे अधिकारी, स्थानिकांचे शिष्टमंडळ, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिकारी यांची एकत्रीत बैठक घेऊन चार दिवसात या प्रश्नावर तोडगा काढला जाईल, असे आश्वासन प्रशासनाने दिल्यानंतर तेथील बंदोबस्त काढण्यात आल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
ग्रामस्थ आंदोलन करण्याच्या तयारीमध्ये होते. मात्र मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना आंदोलन करून दिले नाही. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पोलिसांचा कडेकोट पहारा ठेवण्यात आला. ग्रामस्थांची व ठेकेदारांची बैठक झाली आहे. आठ दिवसांची मुदत ग्रामस्थांनी दिली आहे.
– श्रीकांत किरवले, सहाय्यक पोलीस निरीक्षक, रेवदंडा
जमिनीची एकत्रीत मोजणी करणे, शेतकर्यांंच्या वहिवाटीचा मार्ग मोकळा करण्यात यावा. स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावे या मागणीसाठी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. मात्र पोलीस अधिकारी, ठेकेदार यांच्या समवेत चर्चा झाली. त्यांच्या अश्वासनानंतर सध्या आंदोलन थांबविण्यात आले आहे. आठ दिवसाची मुदत त्यांना देण्यात आली आहे.
– निलेश गायकर, उपसरपंच खानाव