वैद्यकीय अभ्यासक्रम सीईटी परीक्षा 1 सप्टेंबरला

। मुंबई । वृत्तसंस्था ।

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी कक्ष) विविध 66अभ्यासक्रमासह वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरूवात झाली. त्यापाठोपाठ आता पाच पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक सीईटी कक्षाकडून जाहीर करण्यात आले आहे. या अभ्यासक्रमांची सीईटी 1 सप्टेंबर रोजी होणार असून, यासाठी 23 ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना नोंदणी करायची आहे.

फिजिओथेरपी, अ‍ॅक्युप्रेशर थेरपी, प्रोस्थेटिक अ‍ॅण्ड ऑर्थो, स्पीच अ‍ॅण्ड लॅग्वेज पॅथोलॉजी, ऑडियोलॉजी या पाच पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सीईटी कक्षाकडून राबवण्यात येते. या अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक सीईटी कक्षाकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार या अभ्यासक्रमांच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 11 वाजून 59 मिनिटांपर्यंत विद्यार्थ्यांना सीईटीच्या संकेतस्थळावरून अर्ज व परीक्षा शुल्क भरायचे आहे. यशस्वीरित्या अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांचे 28 ऑगस्ट रोजी संकेतस्थळावर प्रवेशपत्र उपलब्ध केले जाणार आहे. या पाचही अभ्यासक्रमाची परीक्षा 1 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 12.30 वाजताच्या दरम्यान होणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर सकाळी 9 ते 10.30 वाजेपर्यंत प्रवेश मिळणार आहे. परीक्षा केंद्राचे प्रवेशद्वार सकाळी 10.30 वाजता बंद करण्यात येणार असून, कोणत्याही कारणास्तव त्यानंतर विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही.

पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पात्रता निकष आणि सामायिक प्रवेश परीक्षेसंदर्भातील माहिती पुस्तिका http://www.mahacet.org च्या सीईटी कक्षाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच ही परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांने महाराष्ट्रातील महाविद्यालयातून पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. तसेच त्याने 31 ऑगस्ट 2024 रोजी आंतरवासिता पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे.

Exit mobile version