। पुणे । वृतसंस्था ।
आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संघटना (फिडे) यांच्यावतीने आयोजित आणि इंडियन ऑईल पुरस्कृत दुसर्या चेस फॉर फ्रीडम परिषदेला पुण्यात उत्साहात प्रारंभ झाला. या परिषदेचे औचित्य साधून फीडे व इंडियन ऑईलच्या पदाधिकार्यांनी येरवडा मध्यवर्ती कारागृहाला भेट दिली. यावेळी त्यांनी फिडे आयोजित तिसर्या आंतर खंडीय बंदीवानांच्या ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्णपदक पटकवणार्या येरवडा कारागृहाच्या संघातील खेळाडूंची भेट घेतली. या संघातील खेळाडूंना इंडियन ऑईल पुरस्कृत “परिवर्तन प्रिझन टू प्राईड“ या उपक्रमाअंतर्गत मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात आले.
या पदाधिकार्यांमध्ये इंडियन ऑईलच्या मनुष्य बळ विभागाच्या संचालिका रश्मी गोवील, फिडेच्या सामाजिक परिषदेचे सल्लागार मिखाइल कोरेनमन, फिडेच्या सामाजिक परिषदेचे आयुक्त आंद्रे वोगटिन, केंद्रीय कारागृह व सुधारगृह सेवा विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता, विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर (आयपीएस), एआयसीएफचे सचिव देव पटेल, एमसीएचे कार्यकारी अध्यक्ष सिध्दार्थ मयुर, एमसीएचे मानद सचिव निरंजन गोडबोले, ग्रँड मास्टर अभिजीत कुंटे, तसेच, कारागृह विभाग व इंडियन ऑईलचे वरिष्ठ अधिकारी यांचा समावेश होता. त्याचप्रमाणे विविध देशांमधील कारागृह अधिकारी यावेळी उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत करताना अमिताभ गुप्ता म्हणाले की, कारागृहातील बंदीवानांच्या पुनर्वसनासाठी आम्ही विविध उपक्रम राबवित असून त्याअंतर्गत शिक्षण घेणार्या संघाने सुवर्णपदक पटकावल्यामुळे या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. मिखाईन कोरेनमन यावेळी म्हणाले की, येरवडा कारागृहाचे अधिकारी आणि इंडियन ऑइल यांचे चेस फॉर फ्रीडम उपक्रमाबद्दल कौतुक केले पाहिजे. सुवर्णपदक विजेत्या संघाला भेटून आम्ही या परिषदेला प्रारंभ करत आहोत. समाजातील वेगळ्या वर्गात बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल त्यांनी इंडियन ऑइल या प्रयोजकांची प्रशंसा केली.कारागृहातील संघाला प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक केतन खैरे म्हणाले की, कैद्यांना बुद्धिबळाचे प्रशिक्षण देण्याबाबत सुरुवातीला प्रचंड नकारात्मक विचार मनात येत होते. पण, माझा मित्र ग्रँडमास्टर अभिजित कुंटे याच्या आग्रहामुळे मी तयार झालो.