| उरण | वार्ताहर |
उरण येथे देऊळवाडी येथे दत्त मंदिर येथे मोठ्या प्रमाणात दत्तजयंतीची सात डिसेंबरला यात्रा भरते. उरण तालुक्यातील सर्व गावातील लोक या यात्रेसाठी येत असतात. या ठिकाणी मुंबई, पनवेल, गोवंडी, मुंब्रा, कुर्ला येथून खेळणी विक्रेते स्टॉलधारक, सर्व प्रकारचे व्यापारी, दुकानदार येत असतात. अशा वेळी वाहतूक कोंडी, शांतता व सुव्यवस्था यासाठी उरणमध्ये बैठक घेण्यात आली.
यावेळी मुख्यधिकारी राहुल इंगळे, उरण पोलीस निरीक्षक गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी शहर चिटणीस शेकाप शेखर पाटील यांनी वाहतूक कोंडी दूर होण्यासाठी पार्किंगची व्यवस्था कोटनाका येथील पेट्रोल पंप शेजारच्या मैदानात, तर चारफाटाच्या पुढे मुळेखंड फाटा तर मोरा परिसरातील नागरिक जुना राजीव गांधी टाऊन हॉलच्या शेजारच्या मैदानात करावी तसेच दुकानदारांना ओळखपत्र व रुग्णवाहिका, डॉक्टर, फायर ब्रिगेडच्या गाड्या तैनात ठेवाव्यात, तसेच स्वयंसेवी संस्था यामध्ये होमगार्ड, सामाजिक संस्था यांची गर्दी नियंत्रण करण्यासाठी मदत घ्यावी, असे सूचित करण्यात आले. याचा नक्कीच विचार केला जाईल, असे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी सांगितले. वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पोलीस नेमण्यात येतील, तसेच नागरिकांनी शांतता व सुव्यवस्था राखावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी दिले. यावेळी उरण शहरातील विक्रेते, नागरिक, पत्रकार, सामाजिक, राजकीय कार्यकर्ते उपस्थित होते.
दत्त जयंती निमित्ताने उरण नगरपालिकेत बैठक
