। खास प्रतिनिधी । रायगड ।
बकरी ईद कालावधीत उच्च न्यायालयाकडील 5 जुलै 2022 च्या न्यायनिर्देश व महाराष्ट्र प्राणी रक्षण कायदा 2015 प्राणी क्लेश कायदा 1960 वाहतूक नियम मधील तरतुदीचे पालन करणे गरजेचे आहे. या कालावधीत जिल्ह्यात या नियमांची अंमलबजावणी करून सुव्यवस्था राखण्याच्या सुचना जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची बैठकीत देण्यात आल्या.
अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात आयोजित बकरी ईदच्या अनुषंगाने जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची बैठक निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस नवी मुंबई पोलीस उपयुक्त ए. एल. राजपूत, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बी. ए. माळवे, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त तथा सदस्य सचिव प्राणी क्लेश प्रतिबंधक समिती डॉ. सचिन देशपांडे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र प्राणी रक्षण कायदा 1976 (सुधारणा 1995) तसेच प्राणी क्लेश प्रतिबंधक कायदा 1960 अन्वये अंमलबजावणी करण्याकरिता अधिनियमातील तरतुदी बाबत माहिती दिली. रायगड जिल्ह्यामध्ये बकरी ईद निमिताने काही प्रमाणावर कुर्बानीसाठी जनावरांची वाहतूक होत असते. वाहतुकीचे नियम मोडून प्राण्यांची वाहतूक होण्याची शक्यता असल्याने नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत तपासणी नाक्यावर पशुवैद्यकीय अधिकातर्याची नेमणूक केल्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्तांनी सांगितले. 4 मार्च 2015 पासून सुधारीत अधिनियमांप्रमाणे गायींची, वळूची व बैलाची कत्तल करण्यास मनाई आहे. तसेच सदर अधिनियमातील नियम 5 अन्वये गाय, वळू व बैल या प्राण्यांची कत्तल, कत्तलीसाठी वाहतुक, कत्तलीसाठी निर्यात, कत्तलीकरीता खरेदी-विक्री, कत्तलीकरीता विल्हेवाट करण्यास मनाई आहे. केंद्र शासनाच्या, 2001 मधील नियम 3 अन्वये गर्भधारणा केलेले पशु, 3 महिन्यांपेक्षा कमी वयाचे पशु, सक्षम अधिकार्यांने कत्तलयोग्य असे प्रमाणिकरण न केलेले पशु यांच्या कत्तलीस प्रतिबंध असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.






