विविध मागण्यांसाठी खा. बाळ्यामामांची भेट

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्न आणि आगरी समाज संघटनेच्यावतीने करण्यात आलेल्या ठरावांवर चर्चा करण्यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार सुरेश तथा बाळ्यामामा म्हात्रे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी तालुक्यातील हुतात्म्यांचा सन्मान आणि रेल्वे स्थानकांच्या नामकरणाबाबत खासदारांनी सकारात्मक प्रतिसाद देत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे.

कर्जत तालुक्यातील क्रांतिकारक हुतात्मा भाई कोतवाल यांच्या बलिदान दिनी माथेरान येथील स्मारकावर, तर हुतात्मा हिराजी पाटील यांना माणिवली येथील स्मारकावर शासकीय मानवंदना देण्यात यावी, असा महत्त्वपूर्ण ठराव संघटनेच्या वतीने सादर करण्यात आला. यावर तातडीने पावले उचलत, राज्य सरकारच्या गृह विभागाला पत्र पाठवून सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन खासदार म्हात्रे यांनी दिले.

तसेच, कर्जत तालुक्यातील रेल्वे प्रवाशांच्या आणि अस्मितेच्या दृष्टीने महत्त्वाच्या मागण्यांवर चर्चा करताना खासदार बाळ्यामामा यांनी, कर्जत रेल्वे स्थानकाला हुतात्मा भाई कोतवाल यांचे नाव देण्यात यावे. तसेच, नेरळ जंक्शन स्थानकाला हुतात्मा हिराजी पाटील यांचे नाव देण्यात यावे. हे दोन्ही विषय आगामी काळात नवी दिल्ली येथे रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करून मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच, हुतात्मा हिराजी पाटील यांच्या नावाचे टपाल तिकीट काढण्यासाठी केंद्रीय दूरसंचार विभागाकडे पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. या भेटीदरम्यान कर्जत तालुका आगरी समाज संघटनेचे अध्यक्ष संतोष पेरणे, उपाध्यक्ष शिवाजी कराळे, संघटनेचे संचालक अंकुश शेळके आणि संदीप म्हसकर आदि मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version