लोकल प्रवासात ताटातूट झालेल्या मायलेकराची भेट

| नेरळ | प्रतिनिधी |

माझी आई हरवली आहे. आई तु कुठ आहेस, असे आर्तस्वरात ओरडणार्‍या एका अडीच वर्षीय बालकाला पुन्हा मातेच्या स्वाधीन करण्यात यश आले आहे. मुंबई सीएसएमटी ते कर्जत लोकलमध्ये ही घटना घडली. चित्रपट अथवा एखाद्या मालिकेतील प्रसंगाला शोभेल अशा घटनेत या बालकाला सुखरुपपणे मातेच्या स्वाधीन करण्यात भिवपुरी रोड प्रवासी संघटनेचे अध्यक्ष किशोर गायकवाड यांना यश आले आहे.

भिवपुरी रोड रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष किशोर गायकवाड हे आपल्या कुटुंबीयांसह कल्याण येथील शुभ कार्यातून उपनगरीय लोकलने घरी परतत होते. दुपारी कर्जत लोकलमधून प्रवास करीत असताना त्यांच्या डब्यात एक दोन अडीच वर्षाचा मुलगा रडत होता. हिंदी भाषेत काही बोलत असलेल्या त्या लहानग्याची आणि आईची लोकल प्रवासात ताटातूट झाली होती. त्यामुळे जोरजोराने आपल्या आईचा धावा घालणार्‍या त्या चिमुरड्याकडे त्या प्रवासी डब्ब्यात सर्व मुलांचे लक्ष जात होते. त्यावेळी किशोर गायकवाड यांनी सामाजिक बांधिलकी दाखवत त्या लहान मुलाची चौकशी केली. त्यानंतर हिंदी भाषेत बोलणार्‍या लहान मुलाची आई लोकलमध्ये हरवली असल्याचे सांगितले. त्यानंतर गायकवाड यांनी तत्काळ कर्जत आणि नेरळ रेल्वे स्थानकात तेथे तैनात असलेल्या पोलिसांशी संपर्क साधला. लोकल पुढे सरकत असताना त्या लहान मुलाचे रडणे काही थांबत नव्हते, मात्र गायकवाड आणि त्यांची पत्नी तसेच उत्तम गायकवाड, सचिन गायकवाड या प्रवाळांनी यांनी त्या मुलाला खाऊ दिले आणि शांत केले.

ते सर्व प्रवास करीत असलेली लोकल ही खोपोली कडे जाणारी असल्याने त्या सर्वांनी नेरळ रेल्वे स्थानक येथे रेल्वे पोलीस यांनी त्या लहान मुलाला नेरळ स्थानकात उतरायला सांगितले. नेरळ स्थानकात लोकल येण्याआधी प्रत्येक बदलापूरपासून पुढील सर्व स्थानकात त्या हरवलेल्या मुलाबद्दल उद्घोषणा केली जात होती. तर लोकल डब्यात देखील अशी उद्घोषणा करण्याची व्यवस्था असल्याने त्या यंत्रणेचा उपयोग या प्रसंगात करण्यात आला. शेवटी त्या लहान मुलाला घेऊन किशोर गायकवाड आणि त्यांचे कुटुंबीय नेरळ रेल्वे स्थानकात उतरले. तेथे रेल्वे पोलीस यांच्याकडे त्या लहान मुलाला दिल्यानंतर गायकवाड आणि अ‍ॅड. उत्तम गायकवाड हे त्या लहान मुलाच्या आईची वाट पाहत थांबले.खोपोली जाणारी लोकल नेरळ स्थानकातून पुढे गेल्यानंतर काही वेळाने त्या लहान मुलाची आई लोकल मधील उद्घोषणा ऐकून तेथे नेरळ स्थानकात उतरली होती. शेवटी त्या आई पासून दुरावलेेल्या मुलाची भेट भिवपुरी रोड प्रवासी संघटनेच्या पदाधिकारी यांच्यामुळे होऊ शकली. नेरळ स्थानकात रेल्वे पोलीस आणि त्या लहान मुलाची आई यांच्या उपस्थितीत लहान मुलाला ताब्यात देवून हे सर्व प्रवासी नेरळ स्थानकात थांबून कर्जत लोकल आल्यानंतर पुढील प्रवास करीत भिवपुरी रोड स्थानकात पोहचले.

Exit mobile version