संघर्ष समिती सदस्यांची दिवाळीनंतर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

| कर्जत | प्रतिनिधी |

पेण अर्बन बँक संघर्ष समिती सदस्य आणि ठेवीदार यांची सभा आ. महेंद्र थोरवे यांच्या कार्यालयात पार पडली. यावेळी संघर्ष समितीच्या सदस्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. त्यावर आ. थोरवे यांनी दिवाळीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बैठक आयोजित करण्याचे आश्‍वासन दिले.

पोसरी येथील शिवतीर्थ कार्यालयात पेण अरबन बँक संघर्ष समितीचे सदस्य व ठेवीदार यांनी आ. थोरवे यांची भेट घेतली. त्यावेळी समितीचे सचिव चिंतामणी पाटील, सदस्य प्रदीप शहा, मोहन सुर्वे यांनी बँकेच्या सद्यःस्थितीची माहिती सांगताना बँक बंद होऊन 12 वर्ष झाली तरी ठोस निर्णय नाही. सुमारे दोन लाख ठेवीदारांना न्याय मिळवून द्यावा. बँकेचा आर्थिक घोटाळा 753 कोटी रुपयांचा आहे. बँकेची मिळकत जमीन सुमारे दोन हजार कोटी रुपयांची आहे. सरकारने सर्व मिळकत ताब्यात घेतली असून, पुढील कार्यवाही होत नाही. आत्तापर्यंत 554 ठेवीदार मरण पावले आहेत. आम्हाला याबाबतीत मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा’ अशी विनंती केली. यावर दिवाळीनंतर लगेचच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबर ही समस्या तसेच रिलायन्स कंपनीने शेतकर्‍यांना योग्य मोबदला दिला नाही या दोन विषयांवर सभा आयोजित करण्यात येईल, असा शब्द दिला.

याप्रसंगी धनंजय देशमुख, श्रीकांत दिवेकर, दिपक साळ्ये, शांतीलाल रावळ, नगरसेवक संकेत भासे, तालुका प्रमुख संभाजी जगताप, अभिषेक सुर्वे आदींसह ठेवीदार उपस्थित होते.

Exit mobile version