आघाडीच्या विजयासाठी रणशिंग फुंकले
| चौल | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील चौल येथे शेतकरी कामगार पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक बुधवारी (दि.21) चौलभोवाळे येथील अमित फुंडे यांच्या निवासस्थानी पार पडली. या बैठकीस चौल मतदारसंघातील शेकापचे निष्ठावान कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत शेकापचे ज्येष्ठ नेते सुरेश खोत यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ कार्यकर्ते शरद फुंडे, चौलचे माजी उपसरपंच काशिनाथ घरत, शेकाप जिल्हा चिटणीस मंडळाचे सदस्य शरद वरसोलकर, रेवदंडा शहर चिटणीस निलेश खोत तसेच चौल पंचायत समिती गणाच्या आघाडीच्या उमेदवार अनया अमित फुंडे उपस्थित होत्या. बैठकी दरम्यान मार्गदर्शन करताना सुरेश खोत यांनी, शेतकरी कामगार पक्षाची विचारधारा, ध्येय आणि धोरणे स्पष्ट केली. चौल जिल्हा परिषद मतदारसंघात शेकाप महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून निवडणूक लढवत असून, आघाडीच्या तिन्ही उमेदवारांना भरघोस मताधिक्य मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच, एक-एक मत महत्त्वाचे असून, मतदारांच्या घरोघरी पोहोचून मतदानासाठी आवाहन करण्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी रेवदंडा शहर चिटणीस निलेश खोत यांनीही आपले विचार मांडले. शेतकरी कामगार पक्ष हा स्व. ना.ना. पाटील, स्व. प्रभाकर पाटील आणि स्व. दत्ता पाटील यांच्या विचारांवर चालणारा पक्ष असून, पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील व राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्या नेतृत्वावर कार्यकर्त्यांचा ठाम विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक प्रयत्न करूनही चौलमध्ये पक्ष फोडता आला नाही, याचे कारण म्हणजे चौलमधील शेकापचा कार्यकर्ता आजही पक्षाशी एकनिष्ठ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शेकाप जिल्हा चिटणीस मंडळाचे सदस्य शरद वरसोलकर यांनी, महाविकास आघाडीच्या तिन्ही उमेदवारांच्या विजयासाठी सर्वांनी झोकून देऊन काम करावे, असा विश्वास व्यक्त करत कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण केला. तसेच, रोहिदास म्हात्रे यांनीही एकदिलाने काम करण्याचे उपस्थित कार्यकर्त्यांना आवाहन केले.
या बैठकीला रोहिदास म्हात्रे, विजय ठाकूर, आर.डी. म्हात्रे, शैलेश नाईक, राजेंद्र नाईक, महेश पाटील, प्रशांत वर्तक, आशिष पाटील, अमित फुंडे यांच्यासह अनेक ज्येष्ठ व निष्ठावंत कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीचे सूत्रसंचालन राजेंद्र ठाकूर यांनी केले. यावेळी त्यांनी शेतकरी कामगार पक्षाचा इतिहास, चौलमध्ये पक्षाच्या माध्यमातून करण्यात आलेली कामे याचा आढावा घेतला. शेवटी आभार प्रदर्शनाने बैठकीची सांगता झाली.
जनतेची सेवा हाच उद्देश: अनया फुंडे
मला उमेदवारी दिल्याबद्दल शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील, राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील तसेच सर्व नेते व पदाधिकाऱ्यांचे मी मनापासून आभार मानते. निवडून आल्यानंतर सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी प्रामाणिकपणे काम करेन. चौल मतदारसंघातील जनतेने मला सेवा करण्याची एक संधी द्यावी, असे आवाहन चौल पंचायत समिती गणाच्या आघाडीच्या उमेदवार अनया फुंडे यांनी केले.






