वाहतुक कोंडीबाबत तहसीलदारांची अधिकार्‍यांसोबत बैठक

विविध समस्या तातडीने सोडविण्याचे निर्देश
। उरण । वार्ताहर ।
वाहतूककोंडी आणि तालुक्यातील इतर समस्यांबाबत तहसिलदारांची विविध अधिकार्‍यांसोबत बैठक घेऊन समस्या तातडीने सोडविण्याचे निर्देश दिले आहेत. रायगड जिल्हा इंटकच्या वतीने उरण तालुक्यातील वाहतूक कोंडी आणि त्यातून होणारे अपघात आणि इतर समस्या सोडविण्यासाठी तहसिलदारांना निवेदन देण्यात आले होते. त्या अनुषंगाने उरणचे तहसिलदार भाऊसाहेब अंधारे यांनी विविध आस्थापनांच्या अधिकार्‍यांच्या बैठकीचे आयोजन केले होते.
उरण तालुक्यात वाहतूकीचे प्रमाण जास्त असल्याने आणि या भागात गोदामे आणि कंटेनर यार्ड मोठ्या प्रमाणात असल्याने तालुक्यातील अनेक रस्त्यांवर ही वाहने अनधिकृतपणे उभी केली जातात. या अनधिकृत पार्कींगमुळे वाहतूक कोंडी होवून अनेक अपघात होतात त्यावर कडक उपाययोजना करावी अशी मागणी इंटकच्या वतीने करण्यात आली होती. त्या बाबत उरणचे तहसिलदार उरण तालुक्यातील वाहतूक पोलिसांना सुचना देवून रस्त्यावरची पार्कींग बंद करण्यासाठी उपाय योजना करण्याचे आदेश दिले आहेत.
या बैठकीला तहसिलदार भाऊसाहेब अंधारे, उरणचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सुनिल पाटील, उरण वाहतूक विभागाचे पोलिस निरिक्षक अशोक गायकवाड, न्हावाशेवा वाहतूक विभागाचे पोलिस निरिक्षक निरज चौधरी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता नरेश पवार, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष जे.डी. जोशी, शहर अध्यक्ष किरिट पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य विनोद म्हात्रे, काँग्रेसचे मच्छिमार सेलचे मार्तंड नाखवा आदी उपस्थित होते.

Exit mobile version