गण आरक्षण निश्‍चितीसाठी आज सभा

तहसीलदार समीर घारे यांनी दिली माहिती
| म्हसळा | वार्ताहर |

पंचायत समिती म्हसळा निर्वाचक गणाचे आरक्षण निश्‍चित करण्यासाठी बुधवार, दि. 13 जुलै रोजी पंचायत समिती म्हसळा येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती तहसीलदार समीर घारे यांनी दिली आहे.

राज्य निवडणूक आयोगाकडून जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2022 अंतर्गत आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे, त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी रायगड अलिबाग यांच्याकडील पत्रान्वये रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात सभा घेऊन अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती (स्त्रियांच्या आरक्षणासह) राखून ठेवावयाच्या जागा आणि उर्वरित स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा निश्‍चित करण्याकरिता सोडत काढणे तसेच आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध करून त्यावर हरकती व सूचना सादर करण्यासाठी परिशिष्ट-16 तहसील कार्यालय म्हसळा व पंचायत समिती कार्यालय म्हसळा येथील सूचना फलकावर सुधारित जाहीर प्रकटन प्रसिद्ध केलेले आहे.

त्याप्रमाणे पंचायत समिती म्हसळा निर्वाचक गणाचे आरक्षण निश्‍चित करण्यासाठी दि. 13 जुलै रोजी दुपारी तीन वाजता पंचायत समिती सभागृह, पंचायत समिती कार्यालय, म्हसळा येथे सभा आयोजित केली आहे, अशी माहिती म्हसळा तहसीलदार समीर घारे यांनी दिली. तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रातील ज्या रहिवाशांची सभेस हजर राहण्याची इच्छा असेल, त्यांनी सदर सभेस हजर राहावे, असे आवाहन तहसीलदार समीर घारे यांनी केले आहे.

Exit mobile version