। माणगांव । सलीम शेख ।
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयीचा आढावा घेताना आपणास हे मान्य करावेच लागते की, डॉ.आंबेडकरांनी भारतातील समाजव्यवस्थेत असणारी घाण कमी केली. अंधारी प्रदेशात झोपडपट्टीत प्रकाश दिला. मातीच्या पुतळ्यात जीव फुलविला आणि एका मानवी इतिहासाची चळवळ देशात सुरू केली याची नोंद जगाला घ्यावी लागली. हा एक देशप्रेम प्रांजळ आविष्कार होय.
स्वातंत्र्यानंतर मंत्रिपद भूषविताना डॉ.बाबासाहेबांनी स्वार्थाला कधीच थारा दिला नाही. सदैव ते जनतेच्या कल्याणासाठी अथक प्रयत्नशील राहिले. त्यांनी राष्ट्रहितबुध्दी कधीच सोडली नाही. राष्ट्रातील उच्चपदी काम करीत असता ज्यांचे नातलग श्रीमंत व धनाढ्य झाले नाहीत. असे आदर्श मंत्र्याचे नाव सांगावयाचे झाल्यास डॉ.आंबेडकरांचे पुण्यशील नाव सांगता येईल. रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील जुने माणगाव काळ नदी पुल याठिकाणी अंबराईमध्ये महाड चवदार तळे सत्याग्रह करण्यासाठी माणगावच्या जनतेची बैठक सभा घेतली. त्याच जागेवर माणगावकर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करू लागले. त्याच पुण्यभूमीवरील बौद्धजन पंचायत समिती माणगाव तालुक्याच्या वतीने आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन रवींद्र मोरे व लहू सकपाळ यांनी केले होते.
येथील धर्म संस्थेत वाहणार्या गटार गंगेला शुद्ध करण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले. त्यांनी येथील समाजाला ठणकावून सांगितले, हिंदू कोड बिल तयार करून समानतेवर आधारित हिंदू धर्माला विश्वधर्म बनवण्याची योजना आखली. परंतु समानतेच्या मारेकर्यांना ती कशी रुचणार! आज देशात स्त्रियांचा दर्जा आणि सामाजिक बदल दिसून येतात याचे सर्व श्रेय डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचेच होय. हिंदू म्हणून जगणार्यांना पाणी पिण्यास सक्त मनाई होती. त्यांनी हे बदल घडवून हक्क मिळवून दिले. सन 1930 च्या गोलमेज परिषदेत त्यांनी इंग्रजांची कान उघडणी केली. कोणत्याही राष्ट्राला दुसर्या राष्ट्रावर राज्य करण्याचा काहीच अधिकार नाही. इंग्रजांचे राज्य जाऊन त्या जागी भारतीय लोक प्रशासन प्रस्थापित करावे या मुद्देसूद भाषणामुळे देशप्रेमामुळे सयाजीराव गायकवाड यांनी मुक्त कंठाने स्तुती केली व सयाजीराव बेहोश होऊन त्यांनी फार मोठी मेजवानी दिली. खरोखरच भारतातून स्वातंत्र्याची मागणी करणे, उठाव करणे आणि इंग्लंडला जाऊन प्रत्यक्ष ब्रिटिशांच्या घरीच स्वातंत्र्याची डरकाळी फोडणे यात फार अंतर आहे.
गांधीजी या भाषणाचा वृत्तान्त वाचून आंबेडकरांना म्हणाले, डॉ.तुम्ही सच्चे देशप्रेमी आहात हे मला आज जाणवले. डॉ.आंबेडकरांनी केव्हाही कोणाच्याही राग लोभाची पर्वा केलेली नाही. त्यांनी अवेशउक्त प्रतिपादन तर्कशुद्ध विचार मांडले. दि.8 ऑगस्ट 1930 रोजी नागपूर येथे भरलेल्या बहिष्कृत वर्गाच्या अध्यक्ष पदावरून त्यांनी अस्पृश्य समाजाचे ध्येय स्वराज्य आहे अशी घोषणा केली. अस्पृश्य समाजाच्या दैनाव्यवस्थेचा शेवट ब्रिटिश राज्यात होणार नाही तर स्वराज्याच्या घटनेद्वारा आपल्या हाती राजकीय अधिकार आल्यानेच होईल अशी त्या परिषदेत त्यांनी राष्ट्रवादी घोषणा केली. असे हे थोर महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन!







