12, 13 फेब्रुवारीला खेळाडूंसाठी बोली
बीसीसीआयकडून वेळापत्रक जाहीर
मुंबई | वृत्तसंस्था |
आयपीएलचा मेगालिलाव 12 आणि 13 फेब्रुवारीला होणार असल्याचे बीसीसीआयकडून अधिकृतरित्या जाहीर करण्यात आल आहे. तसेच 15 व्या सीजनची सुरुवात मार्चअखेरीस होणार असून, मेअखेरपर्यंत ही स्पर्धा चालणार आहे, अशी माहिती बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी दिली.
भारतात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे आयपीएल स्पर्धेचं आयोजन कसं होणार? याबद्दल बरीच चर्चा सुरु आहे. आयपीएलचा 15 वा सीजन होणार आहे. या संदर्भात शनिवारी बीसीसीआय, आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिल आणि आयपीएल फ्रेंचायजी याची एक महत्त्वाची बैठक झाली. ही स्पर्धा भारतातच आयोजित करण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न आहे. यंदाच्या सीजनमध्ये अहमदाबाद आणि लखनऊ हे दोन संघ आहेत. आयपीएलचे आयोजन भारतातच व्हावे, यासाठी आम्ही आमच्या बाजूने सर्व प्रयत्न करु, असे जय शाह यांनी सांगितले.
बीसीसीआय आरोग्य आणि सुरक्षिततेमध्ये कुठलीही तडजोड करणार नाही, हेसुद्धा त्यांनी स्पष्ट केलं. कोरोनास्थितीमुळे बीसीसीआय प्लान बीवरसुद्धा काम करत आहे. 12 आणि 13 फेब्रुवारीला मेगालिलाव कार्यक्रम पार पडेल. ती जागा लवकरच कळवू, असं जय शाह यांनी सांगितलं. बंगळुरुमध्ये हा लिलाव पार पडण्याची शक्यता आहे.