| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत रेल्वे स्थानक विस्तार कामासाठी बुधवारपासून (दि.1) ते 4 ऑक्टोबर पर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. या कालावधीत सकाळी अकरा ते पाच वाजेतपर्यंत नेरळ-कर्जत-खोपोली दरम्यान लोकल गाड्या बंद ठेवण्यात येत आहेत. या मेगा ब्लॉकमुळे कर्जत आणि खोपोली मार्गावरील प्रवाशांचे हाल सुरू आहेत. मध्य रेल्वे वरील कर्जत स्टेशन ते पुणे खोपोलीकडे जाणाऱ्या मार्गावरील यार्ड विस्तारीकरण केले जात आहे.
गेली वर्षभर तेथे अभियांत्रिकी काम सुरू असून, यार्डमधील मालवाहू गाड्यांच्या सेवेत सुधारणा करण्याचे काम तेथे सुरू आहे. या अभियांत्रिकी कामाला मागील महिन्यापासून गती देण्यात आली असून, कर्जत स्थानकात विशेष मेगा ब्लॉक घेतले जात आहे. या कालावधीत कर्जत- खोपोली मार्गावरील वाहतूक सकाळी अकरा ते पाच या वेळेत पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. चार दिवस हा मेगा ब्लॉक घेण्यात आला असून, या कालावधीत मुंबई सीएसएमटी येथून कर्जत -खोपोलीकडे येणाऱ्या उपनगरीय लोकल नेरळ स्थानकातून पुन्हा मुंबईकडे पाठवण्यात येत आहेत.
नेरळ येथून कर्जत येथे जाण्यासाठी सकाळी 9 वाजून 55 मिनिटांची शेवटची लोकल आहे. तर कर्जत येथून खोपोलीसाठी 10 वाजून 40 मिनिटांची शेवटची लोकल आहे. त्याचवेळी खोपोली येथून कर्जतसाठी साडे चार वाजण्याची पहिली लोकल आहे. ती लोकल मुंबईसाठी दहा मिनिटे उशिरा कर्जत येथून पुढे सोडली जात आहे. तर नेरळ येथून कर्जतसाठी पहिली लोकल 5 वाजून 20 मिनिटांनी नेरळ स्थानकातून सोडली गेली.
या दरम्यान नेरळ स्थानकातून मुंबई कडे परत पाठवण्यात आलेल्या उपनगरीय लोकल यांची संख्य दहा एवढी होती.त्यात सीएसएमटी कर्जत या आठ आणि सीएसएमटी खोपोली या दोन उपनगरीय लोकल यांचा समावेश आहे. या कालावधीत एसटी महामंडळ यांनी अतिरिक्त एसटी गाडी सुरू करावी, अशी मागणी केली असून त्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही.







