राज्यात पोलिसांची मेगा भरती

। मुंबई । प्रतिनिधी ।

राज्यात पोलिसांची मेगा भरती केली जाणार आहे. येत्या काही महिन्यात राज्यभरात 75 हजार पोलिसांची भरती करण्याबाबत शासनाने घोषणा केली आहे. ही प्रक्रिया वेगाने पूर्ण व्हावी तसेच पूर्णपणे पारदर्शी व्हावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. सध्या 7231 पदांना मान्यता देण्यात येऊन पोलीस महासंचालकांमार्फत पद भरतीच्या जाहिरातीची प्रक्रीया सुरु असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. भरतीच्या वेळी लेखी परिक्षेच्या अगोदर शारिरिक चाचणी घेण्यात येईल. यासाठी मुंबईतील 20 मैदानांवर संपूर्ण तयारी करा. तसेच मैदानांवर कॅमेर्‍यांची यंत्रणा तयार ठेवा. कुठल्याही परिस्थितीत संपूर्ण पारदर्शी पद्धतीने ही प्रक्रिया झाली पाहिजे व कुठलीही तक्रार येता कामा नये, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

नैमित्तिक रजा वाढविल्या
राज्यातील पोलीस शिपाई ते पोलीस निरीक्षक यांच्या नैमितिक रजा 12 पासून 20 इतक्या वाढविण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. पाचव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार राज्य शासकीय कर्मचार्‍यांना एक वर्षात 12 ऐवजी 8 रजा मंजूर करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता व त्याअनुषंगाने विशेष बाब म्हणून पोलीस अधिकारी, कर्मचार्‍यांना 12 दिवस नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आल्या. मात्र, पोलिसांवरील कामाचा वाढता ताण, विविध सण आणि उत्सवाच्या अनुषंगाने बंदोबस्त, व्हीआयपी कामकाजामुळे या नैमित्तिक रजा आणखी वाढवून 20 दिवस करण्याची विशेष बाब म्हणून मंजूर करण्यात आली.

Exit mobile version