। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची प्रेरणा जागवणाऱ्या आणि शिवभक्तांना एकत्र आणणाऱ्या सकल शिवशंभू भक्त मेळाव्याचे आयोजन रविवार, दि. 9 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता अलिबाग येथे करण्यात आले आहे. या मेळाव्यात अलिबाग पंचक्रोशीतील सर्व शिवकार्य संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. मेळाव्याचे आयोजन श्रीराम मंदिर, रामनाथ (वरसोली), अलिबाग येथे करण्यात आले आहे.
या मेळाव्याचा मुख्य उद्देश अलिबाग पंचक्रोशीतील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक घडामोडींची माहिती सर्व शिवशंभू भक्तांना अवगत करून देणे, तसेच शिवकार्याशी संबंधित विविध संस्था आणि संघटनांमध्ये परस्पर संवाद आणि समन्वय वाढवणे हा आहे. या कार्यक्रमाचे मार्गदर्शन शिवशंभू विचार मंच, कोकणप्रांताचे संयोजक अभय जगताप करणार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनातून शिवकार्याचे महत्त्व, संघटनशक्ती आणि ऐतिहासिक वारशाचे जतन यावर सखोल विचार मांडला जाणार आहे. आयोजकांनी सर्व शिवभक्त, शिवकार्य करणारे कार्यकर्ते आणि संस्थांचे पदाधिकारी यांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.







