हरिश्चंद्र पाटील यांचा नाविन्यपूर्ण उपक्रम; सुमारे 800 किलो खरबुजाचे आले पीक
। पेण । प्रतिनिधी ।
सेझ, अॅरोसीटी, नैना, एमआयडीसी, एमएमआरडी यांसारख्या प्रकल्पांमुळे झटपट पैसा मिळेल म्हणून तरूणांनी शेतीकडे दुर्लक्ष करून शेती विक्री करण्याचा मार्ग अवलंबला. परंतु, अशातच काही असे शेतकरी असतात की जे आपल्या शेतीला काळी आई म्हणून आपल्या उराशी कवटाळून ठेवतात. या शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत असतात. अशा शेतकर्यांमध्येच हरिश्चंद्र पाटील या प्रयोगशील शेतकर्यांनी पुन्हा एकदा शेतीचे महत्त्व अधोरेखित केलेले पहायला मिळते.
पेण तालुक्यातील मसद-बेडी येथील रहिवासी असलेले हरिश्चंद्र पाटील आणि निलम पाटील या दाम्पत्याने आपल्या शेतीमध्ये अनेक नवनवीन प्रयोग केलेले पहायला मिळतात. ज्या खारेपाटामध्ये भाता व्यतिरिक्त कोणतेच पिक घेता येत नाही असे मृदा परिक्षण अधिकार्यांचे मत असताना हे मत खोडून काढण्याचे काम हरिश्चंद्र पाटील यांनी केले आहे. त्यांनी आपल्या 10 ते 12 गुंठ्यामध्ये खरबुज, तर 20 गुंठ्यामध्ये वेगवेगळया प्रकारच्या भाज्या तसेच वेगवेगळया फाळांचे पिक घेतले आहे. त्यांनी आपल्या 10 ते 12 गुंठयामध्ये खरबूजाची शेती घेतली आहे. 700 ते 800 किलो खरबुजाचे उत्पादन आले आहे. ते बाजारात विक्री केली जाणार आहे. तर वांगी, टोमॅटो, गवार, कोबी, मिरची, फ्लॉवर, अश्याप्रकारचा भाजीपाला त्यांनी आपल्या 20 गुंठयाच्या जागेत घेतले आहे. त्यासाठी त्यांनी ठिबक सिंचन पध्दतीने त्याला पाण्याची सोय केली आहे.
खारेपाटामध्ये खरबुजाच्या शेतीचा यशस्वी प्रयोग करून हरिश्चंद्र पाटील यांनी खारेपाटातील शेतकर्यांसाठी एक नवीन दरवाजा उघडा केला आहे. असेच म्हणावे लागेल. साधारणतः ऑक्टोबर, नोव्हेंबर पर्यंत भातशेती पूर्ण होते. त्यानंतर डिसेंबर महिन्यात जर खरबूज पिक घेतल्यास मार्चमध्ये तो देखील पूर्ण होतो. एप्रिल-मेमध्ये शेतीच्या मशागतीची कामे पूर्ण करून जुनमध्ये भातपेरणी करता येईल. तसेच खरबूजच्या शेतीसाठी खताचा लागणारा खर्च हा खुप कमी असून महत्त्वाची बाब म्हणजे पाणी व्यवस्थापन हीच आहे, असेही आमच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी सांगितले.