उरणमध्ये उद्धव ठाकरेंचा घणाघात
| चिरनेर | प्रतिनिधी |
महाराष्ट्राच्या माती मर्द जन्माला येतात, गद्दार नाही. एकाधिकारशाहीच्या गद्दारांना गाढून टाका, असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उरण विधानसभा मतदारसंघात जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या जनसंवाद सभेला माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते, खासदार संजय राऊत, शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील, शिवसेना उपनेते सचिन अहिर, शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे, शिवसेनेच्या भावना घाणेकर, मावळ लोकसभा मतदारसंघाचे संघटक संजोग वाघेरे, माजी आमदार मनोहर भोईर, रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबन पाटील, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, राष्ट्रवादी पवार गटाचे प्रशांत पाटील, शिवसेना उरण तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, उरण संपर्कप्रमुख दीपक भोईर, तसेच आघाडीतील शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट), शेकाप, समाजवादी पार्टी आदी घटक पक्षांचे नेते उपस्थित होते.
यापुढे बोलताना उद्धव ठाकरे यांनी अजून निवडणूक झाली नाही आणि निवडणुकीची सभादेखील ही नाही. ही माझ्या कुटुंबाची सभा आहे. या परिवारात मी सामील झालो आहे. गुजरात आमचाच आहे. आमच्याकडे ते विश्वासाने राहतात. त्यांचं आमचं जवळचं नातं आहे. आम्ही हिंदू आहोत. ते हिंदू आहेत. त्यामुळे त्यांच्याशी आमचं फार जवळचं नातं आहे. मात्र, मोदी गुजरातला चांगले उद्योगधंदे नेत आहेत. देशभक्त मुसलमान देश वाचवण्यासाठी एकत्र आले.
अर्थात, देशभक्त पक्ष एकत्र आले तर यांच्या पोटात का दुखते, असा सवाल करून जात, पात, धर्म बाजूला ठेवून देश वाचवण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. मला माझ्या घराण्याचा अभिमान आहे. भाजपची वंशावळ सांगा असं सांगत, भाजप देशात नंबर वन आहे, असे भाजपवाले सांगत आहेत. पण, तीस वर्षांपूर्वी त्यांना महाराष्ट्रात कोणी विचारत नव्हते. सडलेली पाने गळून पडतात. पण त्याला पुन्हा पालवी येतेच. महाराष्ट्र माझी काळी आई आहे. आदिवासी, शेतकरी, सामान्य, जनतेची मदत इंडिया आघाडीसाठी महाराष्ट्राला आहे, असेही ते म्हणाले. जनसंवाद सभा यशस्वी करण्यासाठी तालुक्यातील शिवसैनिकांनी परिश्रम घेतले.