विजय क्लबने चषक पटकाविला
| मुंबई | प्रतिनिधी |
विजय नवनाथ मंडळाने ‘अमृत महोत्सवी’ वर्षानिमित्त आयोजित केलेल्या पुरुष प्रथम श्रेणी गटात दादरच्या विजय क्लबने विजेतेपद मिळविले. विजय क्लबचा राज नाटेकर स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. त्याला एल.ई.डी. टी.व्ही. देऊन सन्मानित करण्यात आले. सेनापती बापट मार्ग, लोअर परेल येथील फिनिक्स टॉवर शेजारील मैदानात संपन्न झालेल्या पुरुषांच्या अंतिम सामन्यात विजय क्लबने अंकुर स्पोर्टस्चा प्रतिकार 27-22 असा मोडून काढत रोख रूपये एकवीस हजार(21,000) व ‘लोकनेते स्व. दत्ताजी नलावडे’ सुवर्ण चषक आपल्या नावे केला. उपविजेत्या अंकुरला चषक व रोख रू. पंधरा हजार(15,000) वर समाधान मानावे लागले.
विजय क्लबचे या हंगामातील हे दुसरे जिल्हास्तरीय अजिंक्यपद. राज नाटेकरच्या धूर्त चढाया त्याला विजय दिवेकरची मिळालेली पकडीची साथ यामुळेच विजय क्लब हे यश मिळवू शकले. अंकुर स्पोर्टस् कडून अभिमन्यू पाटील, सिद्धेश तटकरे यांनी अंतिम क्षणापर्यंत कडवी लढत दिली. पण संघाला विजय मिळवुन देण्यात ते कमी पडले.
उपांत्य उपविजयी दोन्ही संघांना प्रत्येकी रोख रू. सात हजार(7,000) व चषक देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेचे बक्षीस वितरण खा. अरविंद सावंत, आ. सुनील शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला.