26 लाखांचे मेफेड्रोन जप्त; उल्हासनगर गुन्हे शाखेची कारवाई
। उल्हासनगर । प्रतिनिधी ।
मुंब्रा ते भिवंडीपर्यंत विस्तारलेले एमडी ड्रग्जचे जाळे उल्हासनगर गुन्हे शाखेच्या धडाकेबाज कारवाईत उद्ध्वस्त करण्यात आले. या कारवाईत तब्बल 26 लाख रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले असून एका महिलेपासून नायजेरियन नागरिकापर्यंत पाच आरोपींच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे.
131 ग्रॅम वजनाचा आणि 26 लाख 31 हजार 120 रुपयांहून अधिक किमतीचा हा मुद्देमाल ताब्यात घेत, एका महिलेचा सहभाग असलेल्या पाच जणांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात एक नायजेरियन नागरिकही अटकेत असून, ही कारवाई आंतरराष्ट्रीय ड्रग्ज नेटवर्ककडे संकेत देणारी ठरत आहे.
ही कारवाई उल्हासनगर गुन्हे शाखेचे राजेंद्र थोरवे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार करण्यात आली. 4 ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास नेवाळी परिसरात एक महिला एमडी ड्रग्जसह येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून नौशिन मैनुद्दीन शेख (वय 26, रा. मुंब्रा) हिला रंगेहाथ अटक केली. चौकशीतून पुढे आलेल्या माहितीनुसार, तिचे दोन साथीदार इम्रान खान व हैदरअली शेख यांना मुंब्र्यातून अटक करण्यात आली. यानंतर तपास अधिक खोलवर नेल्यावर, पोलिसांनी मुंबई-नाशिक रोडवरील भिवंडी येथून नायजेरियन नागरिक चुक्स ओगाबोन्ना आजाह आणि त्याचा भारतीय साथीदार सिराज शेख यांना अटक केली. या सगळ्या आरोपींकडून एकूण 131 ग्रॅम एमडी ड्रग्ज हस्तगत करण्यात आला आहे.
या कारवाईचे नेतृत्व उल्हासनगर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड यांनी केले असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीरंग गोसावी, प्रवीण खोचरे, गणेश गावडे, राजेंद्र थोरवे, योगेश वाघ, रितेश वंजारी, मंगेश जाधव, मीनाक्षी खेडेकर, प्रसाद तोंडलीकर, विक्रम जाधव, कुसुम शिंदे, संजय शेरमाळे आणि अविनाश पवार या पथकाने केली.






