। पनवेल । वार्ताहर ।
ठाणा नाका रोडवर असलेल्या गुन्हे शाखा आणि गुप्तवार्ता विभागाच्या कार्यालयाच्या बाजूला असलेली विहीर असुरक्षित आहे. बाजूच्या कठडा उंच नसल्याने तेथे संरक्षक जाळी बसवण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. यासंदर्भात दोन्ही विभागाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
पनवेल शहरात भूखंड क्रमांक 6 वर नवी मुंबई गुन्हे शाखेचे कक्ष क्रमांक दोनशे युनिट आहे. त्याचबरोबर बाजूला राज्य गुप्तवार्ता विभागाचे कार्यालय आहे. याच भूखंडावर एक नैसर्गिक पाण्याचा स्त्रोत असलेली विहीर आहे. विहिरीच्या बाजूला पिंपळ आणि अशोकाची झाडे आहेत. या झाडांचे पान आतमध्ये पडून ते कुजतात. त्यामुळे जलाशयांमध्ये दुर्गंधी निर्माण होते. ही गोष्ट असली तरी विहिरीच्या कडेला फक्त दोन फूट उंचीचा कठडा आहे. बाजूला शाळा असल्याने लहान मुले या ठिकाणी येऊन डोकावतात. त्यामुळे येथे एखादी दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या गोष्टींचा विचार करून सार्वजनिक बांधकाम विभागाने येथे संरक्षक जाळी बसवावी अशी मागणी गुन्हे शाखा आणि राज्य गुप्तवार्ता विभागाच्या कार्यालयाकडून करण्यात आली आहे. यासंदर्भात आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे संयुक्त पाठपुरावा करत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांनी सांगितले.
