| मुंबई | प्रतिनिधी |
राज्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर वरुणराजा पुन्हा एकदा सक्रिय झाला असून, राजधानी मुंबईसह आसपासचे जिल्हे आणि पश्चिम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. अशातच भारतीय हवामान खात्याकडून मुंबई महानगर प्रदेशात पुढील 3 तासांसाठी पावसाचा ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये आज जोरदार ते अतिजोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तसेच, विजांच्या कडकडाटासह 30 ते 40 किमी प्रती तास वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. मुंबई बरोबरच आज रायगड जिल्ह्यातही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार या भागातही जोरदार पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडत आहे. रायगड जिल्ह्यातील रोहा, माणगाव, पनवेल भागात पावसाचा जोर सर्वाधिक आहे.







