नवी मुंबईतील मेट्रो, जलवाहतूक महिनाभरात

नवी मुंबई | प्रतिनिधी |
नवी मुंबई मेट्रोच्या पाच किलोमीटर अंतराच्या मार्गासाठी लागणारी रेल्वे आयुक्तालय सुरक्षा प्रमाणपत्र जानेवारी महिन्यात मिळण्याची शक्यता असल्याने पेंदार ते खारघर या मार्गावर 26 जानेवारी रोजी नवी मुंबईतील पहिली मेट्रो धावणार आहे. तसेच नवी मुंबई ते मुंबई ही जलवाहतुकही सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. नवी मुंबईकरांना नव वर्षांची ही भेट दिली जाणार आहे.
तळोजा नोडमध्ये सिडकोचे घर मिळालेले लाभार्थी या मेट्रोमधून प्रवास करून नवीन घरात गृहप्रवेश करणार आहेत. सिडकोने जुलैपासून सात हजार घरांची नोंदणी व करार केले असून यातील तीन हजार घरे ही तळोजा, खारघर परिसरातील आहेत. नवीन वर्षांत नवी मुंबईकरांची ही दोन स्वप्ने पूर्ण होणार आहेत.
वाहतुकीच्या गैरसोयीमुळे तळोजातील घरांचा ताबा घेण्यास लाभार्थी फारसे इच्छुक नसल्याचे सिडको अधिकार्‍यांनी स्पष्ट केले, मात्र नवी मुंबई मेट्रो उभारणीतील बहुतांशी सर्व अडथळे सिडकोने दूर केले असून राज्य शासनाच्या आदेशाने महामेट्रोकडे काम सुपूर्द करण्यात आले आहे. महामेट्रो या मेट्रोचे संचालन करणार असल्याने कामाला गती आली आहे. तळोजा, पेंदार ते खारघर सेंट्रल पार्कपर्यंतच्या पाच किलोमीटर लांबीच्या मार्गाची सर्व चाचणी भारतीय रेल्वे अंतर्गत संस्थेने पूर्ण केली आहे. या मार्गावर मेट्रो चालविण्यासाठी आता केवळ रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता आहे. ती नवीन वर्षांच्या प्रांरभी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे 26 जानेवारी प्रजासत्ताकदिनी ही सेवा सुरू होण्याची शक्यता सिडको अधिकारी व्यक्त करीत आहेत. याशिवाय नवी मुंबई ते मुंबई या जलवाहतुकीच्या शुभारंभासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येणार आहेत. त्या वेळी या सेवेचा शुभारंभ होण्याची शक्यता आहे.
गेली अनेक वर्ष प्रतीक्षेत असलेली नवी मुंबई ते मुंबई ही जलवाहतूक नवीन वर्षांत प्रारंभी सुरू करण्याच्या हालाचाली सुरू झाल्या आहेत. याबाबत मुंबई पोर्ट ट्रस्टने महाराष्ट्र सागरी मंडळाला एका पत्राद्वारे कामाबाबत विचारणा केली असून सागरी मंडळाने सर्व काम पूर्ण झाले असल्याचे कळविले असल्याचे सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सैनी यांनी कळवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येत असून त्यांच्या हस्ते या जलवाहतुकीचा शुभारंभ होण्याची शक्यता आहे.

Exit mobile version