मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या

| मुंबई | प्रतिनिधी |

सरकारी अधिकारी असलेल्या पतीकडून शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून शिक्षक पत्नीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मुंबईत म्हाडा प्राधिकरणात पती उपनिबंधक आहे. तर महिला शिक्षिका होती. रेणु कटरे असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे, तर बापू कटरे असे उपनिबंधक अधिकाऱ्याचे नाव आहे. मृत महिलेचे पुण्यात राहणाऱ्या बंधूंनी या प्रकरणी समता नगर पोलीस ठाण्यात महिलेचे अधिकारी पती आणि सासूविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून समता नगर पोलिसांनी मृत महिलेचे पती आणि सासू यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिला पतीसह कांदिवली येथे प्रतिष्ठित गृहसंकुलात दोन मुलांसह रहात होत्या. त्यांचे पती म्हाडा मघ्ये उपनिबंधक म्हणून कार्यरत आहेत. मृत महिलेच्या भावाने तक्रारीनुसार त्यांची सासू ही लग्नात कमी हुंडा दिला म्हणून टोमणे मारून त्रास द्यायची. त्यामुळे महिलेच्या वडिलांनी 8 तोळे सोन्याच्या बांगड्या दिल्या होत्या. त्यांचे पती उपनिंबंधक असल्याने दर 2 -3 वर्षांनी त्याची बदली होत असते. ते सतत महिलेवर वडिलांकडून पैसे आणण्यासाठी दबाव टाकायचा, मारहाण आणि शिविगाळ करायचा असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. 2023 साली मृत महिलेच्या वडिलांनी बापूराव कटरे याला 12 लाख रुपये आणि 2024 साली 10 लाख रुपये दिले होते. पंरतु, तरीही महिलेला होणारा त्रास कमी झाला नव्हता. महिलेला होणाऱ्या त्रासावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही कुटुंबातील ज्येष्ठांनी रविवारी (दि.27) बैठक आयोजित केली होती. मात्र, तिच्या पतीने बैठकीला हजर राहण्यास नकार दिला होता. त्यामुळे आशेचे सर्व मार्ग बंद झाल्याने महिलेने शनिवारी रात्री 11 च्या सुमारास कांदिवली येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, रविवारी महिलेचे पती, आरोपी म्हणून ताब्यात घेतले आहे अशी माहिती समता नगर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक निकिता कोळपकर यांनी दिली. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Exit mobile version