|म्हसळा | प्रतिनिधी |
म्हसळा शहरातील नगरपंचायतीच्या कथित निष्काळजी कारभारामुळे गुरुवारी सायंकाळी मोठी दुर्घटना टळली. शहरातील मराठी कन्या शाळेसमोरील गटारावरील तुटलेल्या जाळीवरून घरी जात असताना एका विद्यार्थ्याचा पाय गटारात अडकला. पाठीवर दप्तर असल्याने तोल जाऊन तो खाली पडला आणि त्याच्या पायाला दुखापत होऊन रक्तस्राव सुरू झाला. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्काळ धाव घेत विद्यार्थ्याला बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.
शहरात विविध ठिकाणी नगरपंचायतीने गटारांची कामे केली असली, तरी अनेक ठिकाणी बसविण्यात आलेल्या लोखंडी जाळ्या निकृष्ट दर्जाच्या असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. अवघ्या वर्षभरातच अनेक जाळ्या गंजून तुटल्या असून त्यामुळे नागरिक, विशेषतः शाळकरी विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
मुंबईत उघड्या गटारांमुळे घडलेल्या दुर्घटनांची पुनरावृत्ती म्हसळ्यात होऊ नये, अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत. शहरातील सर्व गटारांची तातडीने पाहणी करून नादुरुस्त जाळ्या बदलण्याची आणि जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
म्हसळा नगरपंचायत मुख्याधिकारी विठ्ठल राठोड यांना याबाबत विचारले असता त्यांनी आपला पत्ता सार्वजनिक बांधकाम खाते यांच्यावर ढकलून हात झटकून मोकळे झाले.
ते म्हणतात याबाबत मी सार्वजनिक बांधकाम खाते यांच्याकडे बोललो आहे. उद्या दुरुस्ती करतील परंतु शहरात असे एक नवे शंभर गटार उघडे आहेत याचं काय? यावरती मुख्याधिकारी काही बोलू शकले नाही असे अधिकारी असतील तर मुंबईसारखी घटना घडणे मागचे कारण हा प्रशासन असू शकतो.
