| म्हसळा | प्रतिनिधी |
म्हसळा नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुनील शेडगे यांची अखेर बिनविरोध निवड झाली आहे. शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक सूफीयान हळदे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला होता. सोमवारी झालेल्या विशेष सभेत निवडणूक पीठासन अधिकारी तथा तहसीलदार सचिन खाडे यांनी शेडगे यांच्या बिनविरोध निवडीची अधिकृत घोषणा केली.यावेळी मुख्याधिकारी विठ्ठल राठोड, गटनेते संजय कर्णिक तसेच महायुतीचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.
नगराध्यक्ष निवडणुकीच्या सुरुवातीच्या टप्प्यात महायुतीतील अंतर्गत मतभेद उघड झाल्याने राजकीय वातावरण तापले होते. सुनील शेडगे यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गट आणि काँग्रेसच्या पाठिंब्याने सूफीयान हळदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे बिनविरोध निवडीची अपेक्षा असतानाच निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. मात्र, 27 मे रोजी हळदे यांनी अर्ज मागे घेतल्याने शेडगे यांच्या निवडीचा मार्ग सुकर झाला. म्हसळा नगर पंचायतीत गेल्या चार महिन्यांत नगराध्यक्ष निवडीची प्रक्रिया चार वेळा पार पडल्याने स्थानिक राजकारण सातत्याने चर्चेत राहिले आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुनिल शेडगे यांना अखेर नगराध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. खासदार सुनील तटकरे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख असलेले शेडगे हे शहरातील चिराठी वाडी-वस्तीतील सामान्य कुटुंबातून पुढे आलेले लोकप्रतिनिधी आहेत. त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे यापूर्वी हुकलेली संधी अखेर त्यांना नशिबाने प्राप्त झाली आहे. नगराध्यक्षपदापूर्वी त्यांनी उपनगराध्यक्ष तसेच बांधकाम व पाणीपुरवठा विषय समितीचे सभापती म्हणूनही यशस्वीपणे काम पाहिले आहे. त्यांच्या निवडीमुळे समर्थक, मित्रपरिवार आणि महायुतीतील कार्यकर्त्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
म्हसळा नगराध्यक्ष सुनील शेडगे यांची बिनविरोध निवड
