म्हसळा तालुका कोरोनामुक्त;लसीकरणावर भर

। म्हसळा । वार्ताहर ।
म्हसळा तालुक्यात नागरिकांच्या सहकार्याने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यास प्रशासनाला पुरते यश प्राप्त झाले आहे.शासनाने माझा कुटुंब,माझा परिवार,कोरोना बाबतीत घ्यावी लागणारी काळजी आणि गतीने झालेले लसीकरण त्यामुळेच तालुक्यातील जनतेला व प्रशासकीय यंत्रणेला कोरोनाची लाट रोखता आली.

तालुका आरोग्य विभाग,तहसील कार्यालय,पोलिस यंत्रणा,मंडळ अधिकारी,तलाठी,ग्रामसेवक,नगर पंचायत प्रशासन,सफाई कामगार, आशा वर्कर,पंचायत समिती प्रशासन व लोकप्रतिनिधी,ग्राम पंचायत प्रशासन व संबंधित लोकप्रतिनिधी,अंगणवाडी सेविका,विविध स्वयंसेवी संस्था,शिक्षण विभाग,व्यापारी वर्ग,पोलीस पाटील,पत्रकार आदी यंत्रणेने कोरोना काळात आरोग्य यंत्रणेच्या बरोबरीने जनतेला वेगवेगळ्या प्रकारची माहिती देत हळूहळू कोरोना मुक्तीकडे वाटचाल करीत असतानाचे चित्र निदर्शनास येत आहे.

म्हसळा तालुक्यात 30454 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यामध्ये 25570 नागरिकांना पहिला आणि 7882 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र म्हसळा,मेंदडी, खामगाव आणि ग्रामीण रुग्णालय म्हसळा येथे लसीकरणासाठी एकुण 33880 डोस उपलब्ध झाले होते पैकी 530 डोस शिल्लक राहिले असल्याचे सांगितले जाते.गतीने लसीकरण करण्यासाठी नागरिकांनी स्वतःहुन पुढे यावे असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रशांत गायकवाड यांनी केले आहे.

Exit mobile version