म्हसळा तालुका पाण्याखाली

। म्हसळा । वार्ताहर ।

राज्यभरात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. मुंबई, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत विविध ठिकाणी पावसाचा जोर आहे. म्हसळा तालुक्यात जुलै महिन्यातील दुसर्‍या पंधरवड्यांत पावसाने विश्रांती घेतल्याने बळीराजाचे लक्ष पावसाकडे लागले, मात्र मागील तीन दिवसांपासून पावसाने पुन्हा जोर धरला असून तालुक्यात सर्वत्र मुसळधार पावसाने आहा कार माजवीला आहे.

तालुक्यातील नद्या, नाले, ओढे जोरदार ओसंडून वाहत असून म्हसळा शहरातून मुंबई आणि इतरस्त्र जाणारे म्हसळा माणगाव साई मार्ग आणि म्हसळा माणगाव गोरेगाव मार्ग पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे. देवघर येथील नदी दुतरफा ओसंडून वाहत असल्याने हा रस्ता बंद ठेवण्यात आला असून देहेन-नर्सरी रस्त्यावर प्रचंड वृक्ष पडल्याने गोरेगाव मार्ग वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील काही भागात तीव्र ते अती तीव्र पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्यानं दिला असल्याने येत्या काही तासात जोरदार पाऊस पाडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

म्हसळा ढोरजे-कुडतोडी-तळा रस्त्यावरील ढोरजे पुलावरून पाणी वाहत असून तळा तालुक्याशीही संपर्क होऊ शकत नाही. गेल्या 24 तासात सुतारवाडी -कुंभळे रस्त्यावर दरड कोसळण्याने वाहतूक बंद, देहेन-नर्सरी रस्त्यावर वृक्ष कोसळल्यामुळे मार्ग बंद झाला असून घोणशे घाटात दरड कोसळल्याने माणगाव रस्ता जाणारी वाहतूक ठप्प झाली असून ढोरजे पुलावरून पाणी वाहत असल्याने तळा तालुक्याशी संपर्क होऊ शकत नाही.सुदैवाने तालुक्यात कुठेही मनुष्यहानी अगर अनुचित प्रकार घडल्याचे वृत्त नाही.

Exit mobile version