रिसॉर्टमधील प्रशासनाची कसून चौकशी करण्याची मागणी
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील किहीम येथील श्रीनिवास म्हात्रे यांचा स्विमींग पूलमधील मृत्यू संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. रिसॉर्टमधील व्यवस्थापनेने योग्य सुरक्षेची दखल न घेतल्याने हा अपघात घडला असल्याचे बोलले जात आहे. फार्म हाऊसमधील व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे. रिसॉर्टमधील प्रशासनाची कसून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी कऱण्यात येत आहे. त्यामुळे अलिबाग पोलीस काय भुमिका घेणार, याकडे लक्ष लागून
राहिले आहे.
थळ येथील बीच वॉक रिसॉर्ट भाड्याने घेतले असून विनोद गुप्ता नामक व्यक्ती हा रिसॉर्ट चालवित आहे. थळमधील बीच वॉक या रिसॉर्टमध्ये रविवारी (दि.7) श्रीनिवास म्हात्रे नातेवाईकांसमवेत गेले होते. तेथील स्विमींग पुलमध्ये पोहण्यासाठी श्रीनिवास म्हात्रे पाण्यात उतरले. मात्र, काही वेळातच त्यांना विजेचा झटका लागून ते पाण्यात बेशुध्द झाले. ही बाब तेथील नागरिकांच्या लक्षात आल्यावर त्यांना अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी नेले. परंतु, तेथील डॉक्टरांनी ते अगोदरच मृत झाल्याचे घोषित केले. त्यामुळे श्रीनिवास म्हात्रे यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला जात आहे. रिसॉर्टमधील व्यवस्थापनाकडून निष्काळजीपणा केल्याने म्हात्रे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जात आहे.
यापुर्वी देखील या रिसॉर्टमधील स्विमींगपुलमध्ये विजेच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली होती. अशाच प्रकारची घटना वारंवार होत असताना पर्यटकांच्या सुरक्षेबाबत योग्य दखल न घेतल्याने श्रीनिवास म्हात्रे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप होत आहे. रिसॉर्टमधील व्यवस्थापन म्हात्रे यांच्या मृत्यूला कारणीभूत असल्याची चर्चा जोर धरत आहे. रिसॉर्टमधील स्विमींग पुलमध्ये पोहण्यास येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेची काळजी घेणे आवश्यक असताना ती घेण्यात आली नसल्याची बोलले जात आहे. त्यामुळे कसून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात
येत आहे.
किहीम येथील श्रीनिवास म्हात्रे यांच्या अपघाती मृत्यूमुळे मोठी शोककळा पसरली आहे. रिसॉर्टमधील व्यवस्थापनाने पर्यटकांच्या सुरक्षेची काळजी घेणे गरजेचे असताना ती घेताना दिसून आली नाही. त्यामुळे या प्रकरणाची योग्य ती चौकशी झाली पाहिजे. कुटुंबाला योग्य न्याय मिळावा अशी मागणी आहे.
ॲड. मानसी म्हात्रे,
शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख





