27 लाख 73 हजारांची फसवणूक
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
ओळखीचा फायदा घेत अलिबागमधील म्हात्रे ज्वेलर्सला 27 लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार भरदिवसा घडला. फसवणूक केल्याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. लग्नासाठी दागिने खरेदीचा बहाणा करीत ही लूट केल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही घटना मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ते नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ऋषिकेश सूर्यगंध, सायली भोईर आणि प्रतिभा सूर्यगंध अशी या आरोपींची नावे आहेत. यातील एक आरोपी सांगली येथील असून, दुसरा आरोपी उरणमधील आहे. आरोपी ऋषीकेश, त्याची आई आणि होणारी पत्नी सायली असे तिघेजण अलिबागमधील म्हात्रे ज्वेलर्सच्या दुकानात दागिने खरेदीच्या बहाण्याने गेले होते. जुन्या ओळखीचा फायदा घेत विवाहासाठी दागिने खरेदी करायचे असल्याचे सांगून पसंतीसाठी काही दागिने घरी घेऊन जायचे ऋषिकेशने सांगितले. ज्वेलर्सने विश्वास ठेवून दागिने दिले. मात्र, अनेक दिवस उलटूनही दागिने परत घेऊन आला नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर अलिबाग पोलीस बुधवारी (दि.5) सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी या गुन्ह्यातील आरोपी ऋषीकेशला अटक केली. त्याला न्यायालयात हजार करण्यात आले असता, पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याची कसून चौकशी केली असता, अन्य आरोपींनी रसिका नामक एका महिलेला दागिने दिल्याची माहिती समोर आली आहे. अन्य आरोपींचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.







