| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल महापालिका क्षेत्रात रविवारी (दि.14) रात्रीपासून ते सोमवारी (दि.15) सकाळपर्यंत जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन अलर्ट मोडवर असून, पाणी साठणाऱ्या भागावरती अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. यासाठी मदत यंत्रणेने सुसज्ज व दक्ष रहावे, असे निर्देश आयुक्त मंगेश चितळे यांनी दिले आहेत. तसेच, पनवेल महानगरपालिकेचे सर्व अधिकारी व कर्मचारी 24 तास आपत्ती व्यवस्थापन करत आहेत. ज्या ठिकाणी पाणी साचले आहे, त्या ठिकाणी पंप लावून पाणी काढण्यात आले आहे. दरम्यान, पाणी साठलेल्या भारत नगर येथील नागरिकांना कोळीवाडा शाळेत स्थलांतरीत होणेबाबत जाहीर आवाहन केल्यानंतर, कोळीवाडा शाळेमध्ये 189 जणांना स्थलांतरित करण्यात आले. तसेच, पटेल मोहल्ला व कच्छी मोहल्ल्यातील सुमारे 155 नागरिकांना पालिकेच्या उर्दू शाळेमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. असे सुमारे 344 नागरिकांना स्थलांतरीत करण्यात आले आहे.
आयुक्तांनी सर्व प्रभाग अधिकाऱ्यांना चोवीस तास सतर्कता बाळगण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. दरम्यान अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे यांनी कळंबोली येथील पंप हाऊसची पाहाणी केली. तसेच सुकापुर, नवीन पनवेल येथे होल्डिंग पॉईंटची परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे, उपायुक्त वैभव विधाते, आरोग्य विभाग प्रमुख अनिल कोकरे, विद्युत विभाग प्रमुख प्रीतम पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक अरुण कांबळे यांनी प्रत्यक्ष पहाणी केली. तसेच, मुसळधार पावसात नागरिकांनी धोकादायक इमारतीमध्ये आसरा घेऊ नये. झाडे होर्डिंग्ज खाली उभे राहू नये, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. नागरिकांची सुरक्षितता व काळजी घेण्यासाठी महापालिका तत्पर असून कोणत्याही परिस्थितीत नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन आयुक्त मंगेश चितळे यांनी केले आहे.







