सिंधुदुर्गात 400 नागरिकांचे स्थलांतरण

। सिंधुदुर्ग । प्रतिनिधी ।

मुसळधार पावसाने सिंधुदुर्गवासियांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. सावंतवाडी तालुक्यात मुसळधार पावसाने अक्षरशः थैमान घातले. सावंतवाडी आणि कुडाळ तालुक्यातील तेरेखोल तसेच कर्ली नदी दुथडी भरून वाहत आहेत. कुडाळ तालुक्यात मागील 24 तासांपासून दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. पावशी आणि ओरोस येथे महामार्गावर पाणी आले होते. तर वेताळ बांबरडे गावात घरांना पाण्याचा वेढा पडला होता. काही बाजारपेठेत पाणी शिरले होते. ऑरेंज अलर्ट असून खबरदारी म्हणून एनडीआरएफचे एक पथक जिल्ह्यात बोलवण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व शाळांना आज सुट्टी ही देण्यात आली आहे.

कुडाळ शहरानजिक असलेल्या पावशी गावाला पुराच्या पाण्याने वेढा दिला आहे. या पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांचे रेस्कू ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. यासाठी एनडीआरफची टीम मागवण्यात आली आहे. या टीमसह कुडाळचे तहसीलदार विरसींग वसावे स्वतः या बचावकार्यात उतरले आहेत. आतापर्यंत 400 जणांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे बांदा-दापोली या राज्य मार्गावर नदीचे पाणी आल्यामुळे रस्ता बंद झाला आहे. सकाळपासून ओसरत असतानाच सपतनाथ नजिक कॅनॉल पुलानाजिक डोंगराचा बराच भाग रस्त्यावर कोसळल्याने रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. सध्या हा मार्ग बंद झाल्यामुळे वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version