आंबेवाडीच्या कुटुंबांचे स्थलांतर; प्रशासनाकडून तात्पुरती व्यवस्था

ग्रामस्थ येथेच राहण्यावर ठाम

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुका आपत्ती व्यवस्थापन विभागाने नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील आंबेवाडीमधील सर्व 42 कुटुंबांचे तात्काळ स्थलांतरण करावे, असे आदेश दि.23 रोजी रात्री दिले होते. त्यानुसार नेरळ ग्रामपंचायतीकडून रात्रीच सर्व 42 ग्रामस्थांना नोटिसा देण्यात आल्या असून, त्यांची तात्पुरती राहण्याची व्यवस्था आनंदवाडी येथील जिल्हा परिषद शाळा आणि मोहाचीवाडी येथील साईबाबा संस्थान येथे करण्यात आली आहे. दरम्यान, स्थानिक आदिवासी ग्रामस्थांनी आम्हाला धोका नाही आणि त्यामुळे आम्हाला हलवू नये. तसेच, हलवायचे असल्यास आमच्या घरांची तसेच जनावरांची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी केली आहे.

नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील माथेरान डोंगररांगामधील विकट गडाच्या पायथ्याशी असलेल्या आंबेवाडी येथील रहिवासी वस्तीवर दरडी कोसळण्याचे धोका असल्याचे त्यांचे स्थलांतरण करण्यात यावे, अशी सूचना कर्जत तालुका आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून दि.23 रोजी सायंकाळी करण्यात आली. त्या ठिकाणी तहसीलदार डॉ. शीतल रसाळ, तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशासक चंद्रकांत साबळे आणि पोलीस तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या प्रतिनिधी यांनी पाहणी केली. त्यावेळी वाडीच्या मागील बाजूस मोठा डोंगर असून, तो खाली आला तर मोठी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन पथकाने नेरळ ग्रामपंचायत आणि नेरळ पोलीस ठाणे यांच्यासोबत बैठक घेऊन आंबेवाडी मधील सर्व ग्रामस्थांना हलविण्यात यावे अशी सूचना केली.

नेरळ ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी गणेश गायकर, तसेच सर्व कर्मचारी वर्ग यांच्यासह सरपंच उषा पारधी, उपसरपंच मंगेश म्हसकर, स्थानिक ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत सदस्य नितीन निरगुडा यांनी सर्व ग्रामस्थांशी चर्चा केली. शेवटी प्रशासनाच्या आदेशाने ग्रामपंचायतीकडून सर्व 42 कुटुंबांना नोटिसा रात्रीच देण्यात देण्यात आल्या आहेत. तर त्या वाडीमधील सर्व 240 लोकांसाठी नेरळ ग्रामपंचायतीमधील मोहाची वाडी येथील साई बाबा संस्थानचे मंगल कार्यालय, आनंदवाडी येथील जिल्हा परिषद शाळा आणि नेरळ गावामधील बापूराव धारप सभागृह येथे तात्पुरती व्यवस्था केली आहे. संपूर्ण वाडी दरडग्रस्त असून, सर्वांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे फलक नेरळ ग्रामपंचायतीकडून आज लावण्यात आले.

ग्रामस्थ अनभिज्ञ
येथील आदिवासी लोक आपली घरे कुलूप बंद करून कोणत्याही ठिकाणी जाण्याच्या स्थितीत नाहीत. चांगले बांधकाम असलेली घरे या आदिवासी वाडीमध्ये असून आमची मौल्यवान घरे तशीच सोडून आम्ही जाऊ शकत नाही, अशी ग्रामस्थांची भूमिका आहे. तर आदिवासी कुटुंबाकडे असलेल्या जनावरांची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न आदिवासी लोकांनी उपस्थित केला आहे. आम्हाला घर बंद करून गेल्यावर तेथे प्रशासन राहण्याची व्यवस्था करणार आहे. परंतु तेथे खाण्याचे काही नियोजन आहे हे प्रशासन सांगत नाही. त्यामुळे आम्ही वाडी सोडून कोणत्या आणि कोणाच्या भरवशावर जायचे असा प्रश्न ग्रामपंचायत सदस्य नितीन निरगुडा यांनी ग्रामस्थांचे वतीने प्रशासनाला विचारला आहे.

Exit mobile version