| पनवेल | प्रतिनिधी |
नवी मुंबई विमानतळाच्या रडार आणि डॉप्लर यंत्रणेमुळे पाम बीच मार्ग आणि त्यालगत असलेल्या शेकडो कोटी रुपयांच्या प्रकल्पांवर आलेले गंडांतर सिडको आणि केंद्रीय विमानतळ प्राधिकरणाने गेल्या तीन वर्षांपासून राबविलेल्या शोधमोहिमेनंतर अखेर दूर झाले आहे.
सिडकोच्या एनआरआय संकुलालगत असलेल्या दिल्ली पब्लिक स्कूलच्या मागील बाजूस असलेल्या मोठ्या पट्ट्यात ही रडार यंत्रणा उभारण्यात येणार होती. यामुळे तीन हजार कोटी रुपयांचे बांधकाम प्रकल्प आणि जमिनीचे व्यवहार ठप्प होतील असा अहवाल सिडकोनेच केंद्र सरकारला सादर केला होता. पाहणी दौरे, तांत्रिक अहवालांनंतर हे रडार आणि निरीक्षण यंत्रणा बेलापूरलगत शहाबाज आणि नियोजित विमानतळाच्या दक्षिणेकडे असणाऱ्या डुंगी गावालगत हलविण्याचा निर्णय झाला. त्यामुळे पाम बीच परिसरातील आलिशान बांधकाम प्रकल्पांना दिलासा मिळाला आहे. नवी मुंबई विमानतळ प्रकल्पासाठी केंद्र आणि राज्य सरकारने डिसेंबर 2025चे लक्ष्य अंतिम केले आहे. विमानतळाच्या उभारणीत महत्त्वाचा टप्पा असलेल्या रडार आणि डॉपलर यंत्रणांच्या उभारणीत अडचण होती. सिडकोमधील वरिष्ठ सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या विमानतळासाठी तीन ठिकाणी रडार यंत्रणा उभी केली जाणार आहे. यापैकी पहिली रडार यंत्रणा पाम बीच मार्गावरील एनआरआय संकुलामागील बाजूस असलेल्या दिल्ली पब्लिक स्कूलच्या मागील बाजूस उभारण्यात येणार होती. याशिवाय दुसरी रडार यंत्रणा विमानतळाच्या अंतर्गत भागात तर तिसरा रडार हा माथेरानच्या डोंगरावर उभारण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
विमानतळाच्या अंतर्गत भागातील रडार यंत्रणेशिवाय बाहेरील बाजूस उभारण्यात येणारे रडार आणि डॉपलर यंत्रणा विमानांच्या परिचलनासाठी महत्त्वाची मानली जात आहे. डीपीएस शाळेमागे हे रडार उभे केले असते तर बांधकाम क्षेत्रातील तीन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक धोक्यात आली असती असा अहवाल सिडकोने केंद्रीय विमानतळ प्राधिकरणाकडे सादर केला होता. या रडारच्या प्रभाव क्षेत्रामुळे आसपासच्या परिसरातील इमारतींच्या उंचीवर मर्यादा येणार होत्या. याशिवाय पाम बीच मार्गालगतचे काही बहुचर्चित बांधकाम प्रकल्पही यामुळे गोत्यात येण्याची चिन्हे होती. यामुळे ही संपूर्ण यंत्रणा इतरत्र हलविण्यासाठी गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेला शोध अखेर बेलापूरलगत असलेल्या ढाकले बेट आणि विमानतळाच्या दक्षिण बाजूस असलेल्या डुंगी गावालगत येऊन थांबला आहे.
या विमानतळासाठी तिसरी रडार यंत्रणा ही विमानतळाच्या पूर्वेकडे असलेल्या माथेरानच्या डोंगररांगांमध्ये उभारण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यासाठी सिडको आणि विमानतळ प्राधिकरणाने आतापर्यंत 11 जागांची पाहणी केली आहे. दाट जंगल आणि पोहोचण्यास अवघड असणाऱ्या या डोंगररांगांपैकी तीन जागांची निश्चिती आतापर्यंत करण्यात आली असून यापैकी एक जागा ही पोलीस वायरलेस संपर्क इमारतीच्या लगतची ठरविण्यात आली आहे. या जागेचे भूसंपादन करण्यासाठी रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केला जात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.