मिहीर धारकरांचा भाजप प्रवेश निश्‍चित

। पेण । प्रतिनिधी ।
माजी मंत्री आप्पासाहेब धारकर यांचा नातू मिहीर शिशिर धारकर यांचा भाजपमध्ये प्रवेश निश्‍चित झालाआहे. पक्षाकडून काही ठोस आश्‍वासने मिळाल्यावर ते हातात कमळ घेणार असल्याचे विश्‍वसनीय वृत्त आहेत.

येत्या हिवाळी अधिवेशनाच्या वेळेला नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा होणार आहे. पेण नगरपालिकेचे आरक्षण जर सर्वसाधारण असेल तर मिहीर धारकर हे भाजपचे पेण येथील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील, असेही सूचित करण्यात आले आहे. पेण अर्बन बँक बुडविणारे शिशिर धारकर यांचे ते पूत्र आहेत.

धारकर पितापुत्र मातोश्रीवर जाऊन शिवबंधन बांधणार होते. अशा प्रकारची देखील चर्चा पेणमध्ये होती. परंतु, मिहीर यांना शिवबंधन बांधण्यापासून मामांनी थांबविले. असे ही बोलले जात आहे. परंतु मिहीर धारकर यांना शिवसेनेत जायचेच नव्हते. त्यांचे भाजपमध्ये जाण्याचे पहिल्यापासून ठरले होते. परंतु, पेण नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळेल की नाही. याबाबत साशंक असल्याने ते वेट अ‍ॅड वॉचच्या भूमिकेत होते.

अखेर भाजप पक्षश्रेष्ठीकडून त्यांना हिरवा कंदील मिळाल्याने मिहीर धारकर यांचा भाजपातील प्रवेश निश्‍चित झाला आहे. या आगोदर मिहीर यांचे आजोबा आप्पासाहेब धारकर यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे भाजप पक्षाच्या संस्कृतीमध्ये मिहीर धारकर यांना जुळवून घेणे कठीण होणार नाही. असे ही बोलले जात आहे.

मिहीर धारकर यांच्या निकटवर्तीयांनी नाव न छापण्याच्या अटीवर कृषीवलशी बोलताना सांगितले की, आम्ही लवकरात लवकर भाजपमध्ये प्रवेश करणार आहोत. परंतु, काही गोष्टींचे आम्हाला ठोस आश्‍वासन मिळणे बाकी होते. ते मिळाले आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठींकडून जेव्हा आम्हाला सांगितले जाईल त्या दिवशी आम्ही भाजपमध्ये प्रवेश करु.

Exit mobile version