जगदीश म्हात्रेसह अनेक शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा
| अलिबाग | प्रतिनिधी |
वासवानी यांच्या अनधिकृत भरावामुळे पाण्याच्या प्रवाहाचा मार्ग बंद झाला. त्यामुळे मिळकतखार येथील भात शेतीमध्ये पावसाचे पाणी शिरले. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अलिबागचे तहसीलदार विक्रम पाटील यांनी नुकसानीची पाहणी केली. यावेळी जगदीश म्हात्रे, विनय कडवे आदी शेतकरी, ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे व्यथा मांडून अनधिकृत भरावाबाबत नाराजी व्यक्त केली. अखेर अलिबागच्या तहसीलदारांना जाग आली. मात्र, प्रत्यक्षात कार्यवाही होईल का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
मागील अनेक महिन्यांपासून मिळकतखार येथे भराव सूरू होते. या भरावाविरोधात उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे तक्रार केली होती. वेळ पडल्यास मिळकतखार अनधिकृत भराव शासन काढायला लावेल असे वक्तव्य अलिबागचे उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांनी सामाजिक कार्यकर्ते संजय गंगाराम सावंत व मिळकतखार ग्रामस्थांशी चर्चा करताना केली होती. पण वारंवार तक्रारी करूनही काहीच ठोस कारवाई झाली नाही. माती माफियांनी चक्क जिल्हाधिकारी कार्यालयाच्या खनीकर्म विभागाचे बोगस पासेस तयार करून हा बेसुमार अनधिकृत भराव केला. बोगस पासेस तयार केलेत हे जिल्हाधिकारी कार्यालयाने मान्य केले व गुन्हे दाखल करण्याचे आदेश केले. पण चार महिने होत आले तरी बोगस पासेस तयार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल झालेले नाहीत.
या भरावामुळे शेतक-यांच्या शेतात पावसाचे पाणी तुंबले आहे. भरावामुळे आजूबाजूच्या गावामध्ये पाणीच पाणी होणार ही भिती खरी ठरली. भरावामुळे अडलेले पाणी ग्रामस्थांनी स्वखर्चाने जेसीबीच्या मदतीने काढण्याचा प्रयत्न केला आहे. अलिबागचे तहसीलदार विक्रम पाटील यांनी मिळकतखार बागदांडा येथे भेट देऊन शेतकऱ्यांच्या नुकसानी बाबत पहाणी केली. तहसीलदार यांनी त्यांच्यासोबत उपस्थित मंडळ अधिकारी व तलाठी यांना योग्य त्या सूचना केल्या व ग्रामस्थांशी सविस्तर चर्चा केली. याबाबत कृषीवलने अनेकवेळा बातमीच्या रुपात प्रशासनाला बेकायदेशीर भरावाबाबत माहिती देण्याचे काम केले.