। नवी मुंबई । प्रतिनिधी ।
वाशीत राहणाऱ्या महिलेस सोने दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून उरण येथील एका व्यक्तीने 8 लाखांचे सोने हडप केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मी देवाची खूप भक्ती करतो मला सोने दुप्पट करता येते अशी थाप मारून सोने घेण्यात आले होते.
सोने दुप्पट करून देणे, नोकरी लावून देणे, विवाह इच्छुक लोकांचे विवाह जुळवणे अशा जाहिरात बस ट्रेन लोकलच्या डब्यात हमखास चिटकवलेल्या दिसून येतात अवश्य संपर्क करा म्हणून दोन तीन फोन नंबर ही दिले जातात. अशांना भुलून अनेक जण आपली फसवणूक करून घेतात. असाच प्रकार वाशीत समोर आला असून, सोने दुप्पट करून देतो अशी थाप मारून 8 लाख 55 हजार रुपयाचे सोने घेतले गेले. या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दीपक पाटील असे यातील संशयित आरोपीचे नाव असून, उरण मधील आदिवासी वाडी येथे तो राहतो. त्याचा वाशीत राहणाऱ्या एका महिलेशी संपर्क आला. त्याने या महिलेला समाज माध्यमातून वारंवार धार्मिक भाषा वापरून विश्वास संपादन केला. मी देवाची खूप भक्ती करतो देव प्रसन्न आहे. अशा थापा मारल्या. आपल्यावर विश्वास बसला अशी जेव्हा संशयित आरोपी पाटील याची खात्री झाली त्यावेळी त्याने सोने दुप्पट करण्याची कला आहे. असेही सांगितले.
यावर विश्वास बसल्याने तक्रारदार महिलेने त्याच्याकडे 2 लाख 70 हजार किमतीचा 3 टोळ्यांच्या बांगड्या, पाच तोळे वजनाचा 4 लाख 60 हजार किमतीचा सोन्याचा राणी हार तसेच सव्वा लाखांचे दीड तोळे वजनाचे कानातील असे एकूण 8 लाख 55 हजार रुपये किमतीचे दागिने दिले. मात्र, अनेक दिवस उलटूनही सोने दुप्पट करून दिले नाहीच शिवाय दिलेले सोनेही पाटील याने परत केले नाही याबाबत वारंवार मागूनही सोने दिले नाहीत. हा सर्व प्रकार 17 ऑक्टोबर 2023 ते 1 ऑक्टोबर 2025 दरम्यान घडला. आपली फसवणूक झाली असल्याची खात्री पटल्यावर तक्रारदार महिलेने वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
सोने दुप्पट करण्याचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
