| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेलमध्ये एका व्यक्तीने सहा जणांना नोकरी लावतो म्हणून तब्बल 16 लाख 44 हजार 499 रुपयांची फसवणूक केली आहे. पनवेल प्लाझा या कॉ.ऑप. सोसायटीतील व्यक्तीने ही फसवणूक केली आहे. मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात या फसवणूकीची सुरूवात झाली. याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
फसवणूक झालेला तरूण नेरूळ येथे राहत असून तो भारतीय पोस्ट विभागात कंत्राटी कामगार आहे. कायम स्वरूपी नोकरी मिळावी यासाठी त्याच्या काही ओळखीच्या व्यक्तीने पनवेलमधील या व्यक्तीचे नाव सूचविले होते. पनवेल शहरातील पनवेल प्लाझा या इमारतीमध्ये या व्यक्तीचे कार्यालयात सुरूवातीला तरूणाची भेट झाली. स्वतः डीआरआय विभागात वरिष्ठ पदावर आणि त्याचे सहकारी कॅप्टन असून ते मर्चंट नेव्हीमध्ये नोकरी लावतात, अशी दोघांची ओळख करून या तरूणाचा विश्वास संपादन केला. सरकारी कार्यालयात किंवा महाराष्ट्र सिक्युरीटी बोर्डात कामाला लावण्यासाठी 70 हजार रुपयांची मागणी केली.
नोकरी लागणार असल्याने या तरूणाने 70 हजार बँकेच्या बचत खात्यातून वळते केले. मात्र 10 महिने नोकरी न लावत असल्याने वारंवार संपर्क केल्यावर त्यांना मुंबई येथील मंत्रालयाजवळ बोलावले. मंत्रालयाच्या सूरक्षा रक्षकाच्या केबीनमध्ये एका अधिका-यासोबत या नोकरी मिळण्यासाठी पाठपुरावा करणा-या तरूणाची ओळख करून देण्यात आली. या अधिका-यानेही नोकरीसाठी प्रयत्न करतो असे या तरूणांना सांगीतले. मात्र अनेक महिने नोकरी लागत नसल्याने या तरूणाने दिलेल्या 70 हजार रुपयांची परत देण्याची मागणी केली. त्यावेळी उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. अखेर आपल्याप्रमाणे इतर पाच तरूणांची फसवणूक झाल्याचे समजले.
नोकरीचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
