शेअर ट्रेडिंगद्वारे लाखोंची फसवणूक

। पनवेल । वार्ताहर ।

गुंतवणूक केलेल्या रकमेवर कोणताही नफा आणि गुंतवणूक केलेली रक्कम परत न करता फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सहा अनोळखी व्यक्तींविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुजवा चक्रवर्ती हे कळंबोली, सेक्टर 16 येथे राहत असून ते फिल्म इंडस्ट्रीमध्ये पोस्ट प्रोडक्शन मार्केटिंग करतात. त्यांना शेअर मार्केट ट्रेडिंग संदर्भात जाहिरात दिसली. त्या लिंकवर क्लिक केले असता त्यांना व्हॉट्सॲप ग्रुपवर अ‍ॅड करण्यात आले. ट्रेडिंग करायचा असल्यास अ‍ॅपवर पैसे टाकावे लागतील असे सांगितले. त्यावेळी त्यांनी पैसे गुंतवले आणि ट्रेडिंग सुरू केली. त्यांना 10 हजार रुपयांचा फायदा झाला. त्यानंतर त्यांनी 25 हजार रुपये पाठवले आणि त्यांना एक लाख रुपये नफा मिळाला. चांगला परतावा मिळत असल्याने ठेवला विश्वास पैसे अकाउंटवर येतात का हे पाहण्यासाठी त्यांनी बँक खात्यावर रक्कम ट्रान्सफर केली. ते त्यांच्या बँक खात्यावर दिसले. त्यामुळे त्यांचा विश्वास वाढला आणि त्यांनी आणखी पैसे ट्रान्सफर केले. त्यांना लाखांचा नफा दिसत होता. त्यांनी एकूण 21 लाख 74 हजार रुपये जमा केले असता अ‍ॅपवर एक कोटी रुपये दिसून आले. त्यानंतर त्यांनी पैसे ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न केला, मात्र ते ट्रान्सफर झाले नाहीत. त्यावेळी तुम्हाला 10 लाख रुपये कमिशन भरावे लागेल, त्यानंतर ते पैसे खात्यावर जमा होतील असे सांगितले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तळोजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रीनुसार गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.

Exit mobile version