दंडाच्या नावाखाली मनपात लाखोंचा गैरव्यवहार

विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांचा आरोप
| नवीन पनवेल | वार्ताहर |
दंड म्हणून वसूल केलेल्या पैशांमध्ये नागरिकांना घाबरवून पावतीपेक्षा जास्त पैसे उकळून दररोज मोठा गैरव्यवहार होत आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी केला आहे. त्याबद्दल माहिती देताना त्यांनी सांगितले की, गेले काही दिवस पनवेलमधील नागरिकांच्या याबाबत तक्रारी येत होत्या, की, पावती कमी रकमेची देऊन जास्त पैसे उकळले जात आहेत. याबाबत पनवेल एस.टी. स्थानक आणि पनवेल रेल्वे स्थानक परिसरात पनवेल महानगर पालिकेचे अधिकृत असलेले मार्शल ज्यांच्याजवळ पालिकेची रिसीट देण्याचे अधिकृत मशीन आहे आणि पालिकेचे ओळखपत्रसुद्धा आहे ते नागरिकांकडून, तेथील फेरीवाले तसेच दुपारच्या वेळी ट्रेनने प्रवास करणार्‍या सर्वसामान्य लोकांकडून जास्त पैसे उकळण्याचे काम करत आहेत, हे समजताच त्याठिकाणी जाऊन कार्यकर्त्यांनी त्यांना जाब विचारला आणि या विषयातील सर्व पुरावे गोळा केले आहेत.

ते पुढे म्हणाले की, ही लोकं सामान्य नागरिकांना हेरतात आणि त्यांना पकडून सांगतात की तुम्ही नियम तोडला आहे. तुम्हाला दोन हजार रुपये दंड आहे, सातशे ते हजार रुपये भरा, तुम्हाला पाचशे रुपयाची पावती अधिकृतपणे मिळेल आणि मास्क न घालने, सार्वजनिक ठिकाणी घाण करणे अशा आरोपामधून निर्दोष सोडण्यात येईल. अशावेळी नागरिकांना घाबरवून रोख रक्कम सातशे ते एक हजार रुपये घेऊन फक्त पाचशे रुपयांची पावती त्यांना देण्यात येते, वरील जादा जमा झालेले दोनशे ते पाचशे रूपयेची रक्कम ही नक्की कोणाच्या खात्यात जमा होते? याची माहिती सामान्य नागरिकांकडे उघड झाली पाहिजे. तसेच यामध्ये प्रशासन किंवा इतरही कोण सामील आहे का? याचीसुद्धा चौकशी झाली पाहिजे.

या कामासाठी नेमलेल्या ‘मरीन सिक्युरिटी अँड इंटेलिजन्स प्रायव्हेट लिमिटेड’ या एजन्सीचे त्वरित काम काढून घेऊन त्यांना दंडसुद्धा आकारण्यात यावा आणि यावर जनतेची लूट केल्याबद्दल फौजदारी गुन्हादेखील दाखल करण्यात यावा.

प्रीतम म्हात्रे, विरोधी पक्षनेते
Exit mobile version