स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई
| अलिबाग | प्रतिनिधी |
बेकायदेशीररित्या डिझेलची तस्करी करणाऱ्या बोटीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकला. या छाप्यात 36 लाख 40 हजार रुपये किंमतीचा डिझेलचा साठा जप्त केला असून चौघांना अटक करण्यात आला आहे. ही घटना 17 जूलैला घडली असून याप्रकऱणी मांडवा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समुद्रमार्गे एक बोटी रेवस जेट्टी येथील किनारी डिझेल घेऊन येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी पोलीस उपनिरीक्षक लिंगप्पा सरगर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रसाद पाटील, संदीप पाटील, राजा पाटील, पोलीस हवालदार यशवंत झेमसे, राकेश म्हात्रे, सुधीर मोरे यांचे एक पथक तयार केले. या पथकामार्फत कारवाई करण्याच्या सुचना करण्यात आल्या. 17 जूलै रोजी पथकाने रेवस बंदरावर सापळा रचला. त्यावेळी एक बोट किनारी येऊन थांबल्याचे दिसून आले. पथकाने तात्काळ छापा टाकून बोटीसह चौघांची चौकशी केली. त्यावेळी बोटीमध्ये 33 हजार लिटर डिझेलचा साठा अनाधिकृतपणे आढळून आला. त्याची किंमत 36 लाख 40 हजार रुपये किंमत असून चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याविरोधात मांडवा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तीन आरोपी बोडणी येथील असून एकजण उत्तरप्रदेशमधील असल्याची माहिती समोर येत आहे.