पोलादपूर तालुक्यात उमेदवारांची खर्चिक धावपळ
| पोलादपूर | प्रतिनिधी |
पोलादपूर तालुक्यातील केवळ 25 ते 30 टक्के मतदार ग्रामीण भागात वास्तव्यास असून, सुमारे 70 टक्के मतदार हे बाहेरगावी राहणारे ‘चाकरमानी’ असल्याचे चित्र आहे. या मतदारांना दुबार मतदार म्हणून गावाकडे आणण्यासाठी उमेदवारांना ने-आण, जेवण-खाणं आणि विविध सोयीसुविधांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करावा लागत असल्याची चर्चा आहे. एवढा खर्च करूनही मतांची खात्री नसल्याने जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारांवर आर्थिक ताण वाढल्याचे दिसते.
यंदा रायगड जिल्हा परिषदेच्या दोन गटांतील सहा उमेदवारांपैकी तुल्यबळ लढतीतील चार उमेदवार तसेच पोलादपूर पंचायत समितीच्या चार गणांतील आठ उमेदवारांना मोठ्या प्रमाणावर खर्चाची तरतूद करावी लागल्याचे चित्र आहे. सकाळी साडेसात ते दुपारी साडेतीन या कालावधीत अधिकृत आकडेवारीनुसार, 55.73 टक्के मतदान झाले. शेवटच्या दोन तासांत मतदानात फारशी वाढ झाल्याचे दिसून आले नाही. कापडे बुद्रुक गटातील उमेदवार अजय सलागरे यांनी कापडे बुद्रुक शाळेत सपत्नीक मतदान केले. निलेश कुंभार यांनी वाकण शाळेत मतदान केले. लोहारे गटातील उमेदवार चंद्रकांत कळंबे यांनी उमरठ येथे, तर कृष्णा कदम यांनी ओंबळी प्राथमिक शाळेत मतदानाचा हक्क बजावला.
कापडे बुद्रुक जि.प. गटात माटवण पं.स. गणांतर्गत गोवेले, उमरठ, धारवली, कालवली, मोरसडे, बोरघर, आडावळे बुद्रुक, बोरावळे, माटवण, देवळे, वाकण, कापडे बुद्रुक, कापडे खुर्द, चांभारगणी बुद्रुक आणि बोरज येथील मतदार साक्षी कांबळेकर विरुद्ध हर्षदा वरवाटकर तसेच अजय सलागरे विरुद्ध निलेश कुंभार यांचे भवितव्य ठरविणार आहेत.
कापडे बुद्रुक पंचायत समिती गणात देवळे, करंजे, दाभिळ, लहुळसे, केवनाळे, वाकण-1, वाकण-2, नानेघोळ, कापडे खुर्द, कापडे बुद्रुक 1, 2, 3, रानकडसरी, रानबाजिरे, चांभारगणी बुद्रुक, निवे, किनेश्वर, साखर येथील मतदारांनी अजय सलागरे विरुद्ध निलेश कुंभार यांच्यासह अनिल दळवी विरुद्ध अनिल मालुसरे यांच्या लढतीसाठी मतदान केले.
लोहारे जि.प. गटांतर्गत कोतवाल बुद्रुक पं.स. गटातील काटेतळी, सडवली, चोळई, कोंढवी, महालगूर, ओंबळी, कोतवाल खुर्द, परसुले, कोतवाल बुद्रुक-1, 2, पैठण, भोगाव खुर्द, महाळुंगे, मोरगिरी, फौजदारवाडी, धामणदिवी, देवपूर, पळचिल, गोळेगणी येथील मतदारांनी कृष्णा कदम (कमळ), अ. रझाक करबेलकर (हात), चंद्रकांत कळंबे (शिवसेना), कृष्णा कदम (ढोबळी मिरची) या उमेदवारांसह पंचायत समितीच्या कोतवाल गणातील सुरेंद्र चव्हाण आणि अविनाश शिंदे यांचे भवितव्य मतपेटीत बंद केले. याच गटातील लोहारे पंचायत समिती गणात सवाद, सवाद-2, कणगुले, पार्ले, लोहारे-1, लोहारे-2, चरई, तुर्भे बुद्रुक, तुर्भे खुर्द, तुर्भे खोंडा, वझरवाडी, दिविल येथील मतदारांनी युगज्ञा दीपक उतेकर विरुद्ध अनिता अनिल भिलारे यांच्या लढतीसाठी मतदान केले.
तालुक्यातील सर्व मतदान केंद्रांच्या 100 मीटर परिघाबाहेर लक्झरी बस, कार, जीप आणि छोट्या प्रवासी वाहनांची मोठी गर्दी दिसून आली. सुमारे 70 टक्के मतदार बाहेरगावी वास्तव्यास असल्याने त्यांच्या वाहतुकीवरील खर्च सर्वसामान्य उमेदवारांना परवडणारा नसल्याची भावना व्यक्त होत आहे. यामुळे भविष्यात ग्रामपंचायत, नगरपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांतील अनावश्यक खर्च टाळण्यासाठी बाहेरील मतदारांना पोस्टल मतदानाची सुविधा देणे किंवा मतदार ओळखपत्र आधारकार्डशी लिंक करून एकाच ठिकाणी मतदानाची व्यवस्था करण्याची गरज व्यक्त होत आहे.
पोलादपूर तालुक्यात मुंबईतील मतदार उमेदवारीसाठी येतात, तर ग्रामीण भागातील मतदार असलेले कार्यकर्ते नगरपंचायतीसाठी उमेदवार होतात. काही मतदारांना मुंबई व ठाणे महानगरपालिकांमध्ये उमेदवारी मिळून ते तेथे नगरसेवकही झाले आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीतही बाहेरील मतदारांना संधी मिळत असल्याचे दिसते. त्यामुळे मतदार ओळखपत्र आधारशी लिंक केल्यास मतदारांची मतदान केंद्रे स्पष्ट होतील आणि योग्य ठिकाणी मतदान व उमेदवारीची संधी उपलब्ध होईल, अशी मागणी पुढे येत आहे. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत 11 हजार 163 पुरुष व 10 हजार 705 महिला असे एकूण 21 हजार 868 मतदारांनी मतदानात सहभाग नोंदविला.






