कुर्डुस सरपंचाकडून लाखोंचा घोटाळा

विकासकामांचा निधी हडप
कारवाईसाठी विभागीय आयुक्तांना अहवाल
ग्रामसेवकाचाही हात
अलिबाग | वार्ताहर |
कुर्डुसचे सरपंच अनंत पाटील यांनी जवळपास 30 लाखांचा घोटाळा केल्याचा प्रकार तपासातून उघडकीस आला आहे. 14 वा वित्त आयोग आणि ग्रामनिधीच्या नावाखाली लाखोंची रक्कम हडप केल्याचे समोर आले आहे. कॅशबुक मध्ये खाडाखोड करून व चुकीची प्रमाणके जोडून जनतेने विश्‍वासाने दिलेल्या सरपंचपदाचा गैरवापर करीत ग्रामस्थांची फसवणूक केली आहे. आणि हा सर्व प्रकार करत असताना कुर्डुस ग्रामपंचायतीचे सरपंच अनंत पाटील यांच्यासोबत ग्रामसेवक सुनिल म्हात्रेसुद्धा सामील असल्याचे कळले आहे.
विकासकामांसाठी आलेला निधी हडप करण्याचा प्रकार सरपंच आणि ग्रामसेवकाने ग्रमपंचायतीमध्ये केला असल्याने त्यांच्याविरूद्ध ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम 39 (1) अन्वये प्रशासकीय कारवाईसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पाटील यांनी कोकण आयुक्तांना कळविले आहे. कारवाईनंतर ही रक्कम वसूल केली जाणार आहे.
तसेच 14 वा वित्तआयोग आणि ग्रामनिधीच्या अंतर्गत कामे करताना प्रमाणक न घेणे, मंजुराचे हजेरीपत्रक कोरे ठेवणे, कॅशबुक मध्ये विकास कामांच्या नावात खाडाखोड व कॅशबुकवर खर्चाचा तपशिल आणि संबंधित प्रमाणकावरील तपशिल यांमध्ये तफावत, प्रमाणकांवर खर्चाचा संमुर्ण तपशील नमुद करून त्यावर ठेकेदाराची व सरपंचाची स्वाक्षरी न घेणे, अंदाजपत्रक न घेता मुल्यांकन दाखले घेणेे व काही कामांचे मुल्यांकन दाखले न घेणे तसेच काही कामे मंजूर करताना स्थानिक वृत्तपत्रात जाहीर नोटीस प्रसिद्ध करणे आवश्यक असतानाही नियमांचे उल्लंघन करीत त्या प्रसिद्ध न करणे हे सर्व प्रकार करून सरपंच अनंत पाटील व ग्रामसेवक अधिकारी सुनिल म्हात्रे यांनी लाखोंचा घोटाळा केल्याचा आरोप आहे.


थेट नागरिकांमधून निवडून येणाय्रा सरपंचाकडे महत्वाचे अधिकार देण्यात आलेले आहेत. या अधिकाराचा गैरवापर करून कशा प्रकारे भ्रष्टाचार केला जातो, हे जिवंत उदाहरण कुर्डुस ग्रामपंचायत आहे. सरपंचाला ग्रामसेवकाचीही तितकीच साथ असल्याने हे घडले आहे.
सुनील पिंगळे, तक्रारदार

विकासकामांसाठी आलेल्या निधीचा योग्य वापर व्हावा, यासाठी काही नियम घालून दिलेले आहेत. या नियमांनुसार कॅशबुक, स्टॉक रजिस्टर योग्य पद्धतीने सांभाळणे आवश्यक आहे. अशा नियमांचे उल्लंघन झाल्याचे कुर्डुस ग्रामपंचायतीमध्ये दिसून येत आहे.
डॉ. किरण पाटील, सीईओ.जि.प.रायगड

Exit mobile version