| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ रेल्वे स्थानकातून माथेरान या पर्यटन स्थळाकडे जाण्यासाठी मिनीट्रेन सोडली जाते. या मिनीट्रेनच्या गाडीची तिकीट मागील 50 वर्षे ज्या तिकीट खिडकीवर मिळायची ते तिकीट घर तोडण्यात आले आहे. त्यामुळे नेरळ-माथेरान मिनीट्रेन प्रवास करण्यासाठी काढावी लागणारी तिकिटे आता नवीन तिकीट खिडकीवर काढावी लागत आहेत. जुने तिकीट घर आणि तेथे पर्यटक प्रवासी यांना थांबून राहण्याची असलेली व्यवस्था आता राहणार नसल्याने पर्यटक प्रवासी यांच्याकडून नाराजी व्यक्त होत आहे.
नेरळ जंक्शन स्थानकातून माथेरान या पर्यटन स्थळासाठी मिनीट्रेन चालविली जाते. 1909 मध्ये नेरळ माथेरान नेरळ अशी मिनीट्रेन सुरु झाली. त्यानंतर या मिनीट्रेनची तिकीट नेरळ स्थानकात ज्या तिकीट घरामध्ये दिली जात होती ते तिकीट घर आता नाहीसे होत आहे. एकावेळी तीन तिकीट खिडक्यांची व्यवस्था असलेले तिकीट घर मेन लाईन वरील नवीन मार्गिका टाकण्याच्या कामासाठी अडथळा ठरत असल्याने ते तिकीट घर तोडण्यात येत आहे. त्याचवेळी त्या तिकीट घरामध्ये मध्य रेल्वेचे पुस्तकालय होते आणि त्या पुस्तक हे देखील अन्यत्र हलवावे लागत आहे. या तिकीट घराच्या 10 मीटर अंतरावरून नेरळ माथेरान मिनीट्रेन गाडी सोडली जात होती. त्यामुळे पर्यटक यांना देखील हे तिकीट घर फायद्याचे ठरत होते. मात्र, आता नेरळ येथून माथेरानसाठी जाणाऱ्या गाडीचे तिकीट मुख्य तिकीट घर येथे मिळत आहे. त्यासाठी फलाट क्रमांक दोन वरील मुख्य बुकिंग कार्यालयात पहिल्या दोन खिडक्या आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. मात्र त्या तिकीट खिडक्यांच्या बाजूला मुंबई आणि कर्जत कडे जाणारे प्रवासी हे देखील तिकीट काढण्यासाठी येत असल्याने तेथे लोकल पकडण्यासाठी धावपळ करणाऱ्या प्रवाशांची धावपळ वाढली आहे.
मिनीट्रेनची बुकींग नवीन जागेत
