| माथेरान | वार्ताहर |
काही महिन्यांपूर्वी मिनिट्रेनची नेरळ माथेरान या दरम्यान प्रवासी वाहतूक सेवा सुरू करण्यात आली होती. या सेवेस पर्यटकांकडून मोठा प्रतिसाद लाभला आहे. परंतू या मार्गावर ठराविक फेरी असल्याने पर्यटकांमध्ये नाराजी सुर असून या मार्गावरील फेऱ्या वाढवावेत अशी मागणी येथे येणाऱ्या पर्यटकांकडून होत आहे. नेरळ माथेरान मिनीट्रेन हेच माथेरानचे मुख्य वैभव आहे. या मीनी ट्रेनच्या सफरी करता देश-विदेशातून अनेक पर्यटक माथेरानला भेट देत असतात. काही महिन्यांपूर्वी नेरळ माथेरान अशा नियमित दोन फेऱ्या सुरू झाल्यानंतर पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. परंतू या दोन फेऱ्यांना लाभलेला प्रतिसाद पाहता या दोन फेऱ्या कमी पडू लागल्या असून या फेऱ्या वाढवाव्यात अशी मागणी येथे येणार प्रत्येक पर्यटक करत असतात.
नेरळ माथेरान मेनी ट्रेन सुरू झाल्यापासून या गाड्या सतत हाऊसफुल होत आहेत. या एका गाडीने एकावेळी द्वितीय श्रेणीतून 90 तर प्रथम श्रेणीतून फक्त 30 प्रवासी प्रवास करू शकतात. त्यामुळे मर्यादित प्रवासी संख्या या गाडीतून होत आहे. मात्र रोज येणाऱ्या पर्यटकांची संख्या हजारोंच्या घरात असते व प्रत्येकाला या ट्रेनमधून प्रवास करावा अशी प्रबळ इच्छा असते. परंतू तिकीट अभावी त्यांना हा प्रवास करता येत नाही.
माथेरान ते अमन लॉज ही प्रवासी शटल सेवा सुरू झाल्यानंतर या सेवेला पर्यटकांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला व तोट्यात चालणारी नेरळ माथेरान सेवा शटल सर्विसमुळे प्रचंड नफा कमवू लागली. त्यामुळेच रेल्वे प्रशासनाने अमन लॉज ते माथेरान या सेवेला प्राधान्य देत नेरळ माथेरान सेवेकडे दुर्लक्ष केले असे स्थानिकांचे म्हणणे आहे. काही वर्षांपूर्वी नेरळ ते माथेरान या दरम्यान पाच प्रवासी गाड्या सुरू होत्या त्यातील एक गाडी संध्याकाळी मुक्कामी सुद्धा होती तर एक मालगाडी दररोज येत असे परंतु आता फक्त नावापुरताच नेरळ माथेरान मिनी ट्रेन चालवली जात असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. पूर्वी कोणतीही आधुनिक साधने नसतानाही नेरळ येथून माथेरानला येणारी मिनी ट्रेन सव्वा तासांमध्ये पोहोचत असे. आता मोठ्या हॉर्स पॉवर क्षमतेची इंजिनही वापरुनसुध्दा या गाडीचा स्पीड मात्र फार कमी केल्याने पावणेतीन तास लागत आहेत. त्यामुळे पर्यटक बेजार होत आहेत. अनेक पर्यटकांकडून या गाडीची वेळ कमी करावी, नेरळ माथेरान या मार्गावरती जास्तीत जास्त फेऱ्या सुरू कराव्यात अशी मागणी प्रत्येक पर्यटकांकडून होत आहे.
शालेय जीवनात शाळेतून सहलीनिमित्त या गाडीतून प्रथम प्रवास करतानाच्या आठवणी आजही ताज्या आहेत. त्यामुळे कुटुंबाला घेऊन पुन्हा यात एकदा या गाडीने प्रवास केला परंतु पावणेतीन तास लागणारी वेळ ही निश्चितच खूप मोठी आहे या गाडीत प्रवास करण्याची मजा खूप वेगळी असली तरी रेल्वे प्रशासनाने हा वेळ कमी करावा जेणेकरून पर्यटकांना त्याचा आनंद घेता येईल.
-संजोग जाधव, पर्यटक पुणे
पंचवीस वर्षांपूर्वी आमची मुले लहान असताना या गाडीने प्रवास केला होता व आज त्याच मुलांच्या आग्रहाखातर पुन्हा एकदा नेरळ माथेरान गाडीने प्रवास केला परंतु या प्रवासा करता लागणारी वेळ खूपच जास्त आहे तरीही हा प्रवास आनंद देणारा आहे त्यामुळेच या गाडीच्या फेऱ्या वाढवुन प्रशासनाने जास्तीत जास्त पर्यटकांची सोय करावी.
जिग्नेश पटेल, पर्यटक सुरत






