विठ्ठल मंदिरातील कर्मचाऱ्यांना मारहाण
| पंढरपूर | प्रतिनिधी |
रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांच्यासोबत विठ्ठल मंदिरात आलेल्या शिवसेनेच्या काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मंदिरातील कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केले. शिवाय, धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला आहे. या गोंधळामध्ये मंदिरातील एक कर्मचारी रक्त बंबाळ झाला आहे. दरम्यान, घडलेला प्रकार दडपण्यासाठी व्यवस्थापनाने केवळ माफीनाम्यावर मलमपट्टी केली आहे. मंदिरात झालेल्या गोंधळाची चौकशी करुन मंदिर समितीने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी कर्मचारी व भाविकांमधून केली जात आहे.
मंत्री गोगावले बुधवारी (दि.12) सकाळी विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी आले असता, त्यांच्या समोरच हा सगळा गोंधळाचा प्रकार घडला. आषाढी यात्रेच्या निमित्ताने मंदिर समितीने व्हीआयपी दर्शन सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, मंत्री गोगावले यांच्यासमवेत शिवसेनेच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री व इतर कर्मचाऱ्यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी धक्काबुक्की करत अधिकारी व कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केले. यावेळी शाब्दिक बाचाबाचीही झाली. यामध्ये मंदिरातील एका कर्मचाऱ्यांच्या पायाला दुखापत झाल्याने तो रक्तबंबाळ झाला, तरीही बराच वेळ राडा सुरु होता.
यापूर्वीदेखील मंदिरातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बाबतीत असे प्रकार घडले आहेत. अलीकडच्या काळात सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांकडून मंदिरातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना धमकावण्याचे प्रकार घडले आहेत. मंदिरातील अधिकाऱ्यांनी कोणाचाही मुलाहिजा न ठेवता थेट पोलीस कारवाई करावी, अशी मागणी मंदिरातील कर्मचारी व भाविकांमधून केली जात आहे. याबाबत मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांना विचारले असता ते म्हणाले की, रोजगार हमी मंत्री भरत गोगावले दर्शनासाठी आले होते. त्यावेळी त्यांच्या सोबत आलेल्या काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मंदिरातील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केले. धक्काबुक्कीदेखील झाली.
शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या माफीनाम्यावर दडपले प्रकरण
या प्रकारानंतर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख असलेल्या चरण चवरे यांनी मंदिर समितीला घडलेल्या प्रकाराबद्दल माफीनामा लिहून दिला आहे. त्यांच्या या लेखी माफीनाम्यावर अधिकाऱ्यांनी हे प्रकरण दडपल्याची चर्चा सुरु झाली आहे. मंत्री भरत गोगावले हे मंदिरात दर्शनासाठी आले असता, मंदिरातील कर्मचाऱ्यांबरोबर समज गैरसमजातून जे काही गोष्टी घडल्या आहेत, त्या चुकून घडल्या आहेत. आमच्या पदाधिकाऱ्यांकडून व माझाकडून काही चुकीचे घडले असेल तर आमच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो, असा माफीनामा मंदिर समितीला दिला आहे. त्यानंतर मंदिर समितीच्या अधिकाऱ्यांनी कारवाईची तलवार म्यान केल्याची चर्चा आहे.






