कर्नाटकातील मंत्र्यांना शिवसैनिकांनी अडवले

। कोल्हापूर । प्रतिनिधी ।

कर्नाटकातील माजी मंत्री व विद्यमान आमदार गुरूवारी अंबाबाईच्या दर्शनासाठी आल्यानंतर शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या शिवसैनिकांकडून त्यांच्या गाड्या अडवण्यात आल्या होत्या. दुपारी एकच्या सुमारास मंदिर परिसरातील या गोंधळामुळे वातावरण काही काळ तणावपूर्ण बनले होते. यावेळी, माजी मंत्री प्रभू चव्हाण व सुनील कुमार यांना शिवसैनिकांनी अडविल्यानंतर त्यांनी सध्या बेळगावमध्ये सुरू असलेल्या अधिवेशनात तुमच्या भावना मांडू, असे आश्‍वासन दिल्यानंतर वातावरण निवळले.

ठाकरे सेनेचे नेते व कार्यकर्ते गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यासाठी गेले होते. याचवेळी त्यांना कर्नाटकातील लोकप्रतिनिधी कोल्हापुरात आल्याची बातमी मिळाली होती. त्यांनी थेट अंबाबाई मंदिरात आलेल्या लोकप्रतिनिधींना अडवत जाब विचारला की, मराठी भाषिकांना मराठी एकीकरण समितीच्या महामेळाव्याला येऊ दिले जात नाही. तर, तुम्हालाही महाराष्ट्रात फिरू देणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली होती. तसेच, ठाकरे सेनेचे उपनेते विजय देवणे म्हणाले की, सोमवारी शिवसैनिक महामेळाव्यासाठी जात असताना कोगनोळी येथे त्यांना अडवण्यात आले होते. मेळाव्यादरम्यान मराठी भाषकांना अटक करण्यात आली. ही दडपशाही आम्हाला मान्य नाही. जर कर्नाटकमध्ये जात असताना मराठी भाषकांना अडवत असतील आणि कर्नाटकातील लोकप्रतिनिधी महाराष्ट्रात, कोल्हापुरात येत असतील, तर शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षातर्फे कर्नाटकांच्या लोकप्रतिनिधींना अडवणार, असे त्याचवेळी जाहीर केले होते. त्यामुळे गुरूवारी अंबाबाई मंदिरात आलेल्या कर्नाटकातील आमदार, माजी मंत्र्यांना अडवण्यात आले होते.

सध्या बेळगावमध्ये सुरू असलेल्या अधिवेशनात हा मुद्दा मांडण्याचे आश्‍वासन या नेत्यांनी दिले आहे. यावेळी उपनेते संजय पवार, शशिकांत बिडकर, अवधूत साळोखे, गोविंदा वाघमारे, चंदू भोसले, दीपक गौड, दिनेश परमार, हर्षल सुर्वे उपस्थित होते.

Exit mobile version