मिनीट्रेन रद्द, पर्यटकांची नाराजी

| नेरळ | प्रतिनिधी |

नेरळ-माथेरान मिनी ट्रेन मार्गावर दरडी कोसळून कोणताही धोका पत्करावा लागू नये यासाठी नेरळ-माथेरान-नेरळ मिनीट्रेन सोमवारी एक दिवसासाठी बंद ठेवण्यात आली. स्थानिक रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मिनी ट्रेनच्या दोन्ही फेऱ्या रद्द करण्यात आल्याने पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली.

दरवर्षी जून महिन्यात नेरळ माथेरान नेरळ मिनी ट्रेन बंद ठेवली जाते आणि ऑक्टोबर महिन्यात पुन्हा एकदा पर्यटकांच्या दिमतीला येते. मात्र, यावर्षी मे महिन्यात अवकाळी पाऊस सुरू झाला आणि पर्यटकांनी धुक्यातून वाट काढणारी मिनी ट्रेनमधून प्रवास करण्याचा आनंद पर्यटकांनी मागील 20 दिवस घेतला आहे. परंतु, 26 मे रोजी मुसळधार पाऊस झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून माथेरान साठी जाणाऱ्या सकाळच्या दोन्ही ट्रेन रद्द करण्यात आल्या. परिणामी, माथेरानला जाण्यासाठी आलेले आणि माथेरानमधून आपल्या घरी परतण्याच्या तयारीत असलेल्या पर्यटकांची गैरसोय झाली. घाटात दोन दिवसांपासून पाऊस आहे, त्यात धुकेदेखील प्रचंड असल्याने आम्ही स्थानिक प्रशासनाने प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन मिनीट्रेन रद्द करण्यात आल्याचे आयडब्ल्यू विभागाचे अनिल सानप यांनी सांगितले.

Exit mobile version