। नेरळ । वार्ताहर ।
दुरुस्तीच्या कामासाठी बंद असलेली नेरळ-माथेरान-नेरळ अशी चालविली जाणारी मिनीट्रेन आगामी काळात सुरु होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नॅरोगेज मार्गाची दुरुस्ती केली जात असून मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. यावेळी मिनीट्रेनची रिकाम्या डब्ब्यांची चाचणी गुरुवारी (दि.29) घेण्यात आली. नेरळवरून निघालेली मिनीट्रेन माथेरानला जात असताना गाडीचे डब्बे नॅरोगेज रुळावरून खाली घसरले. या घटनेमुळे मिनीट्रेन लवकर सुरु होण्याची आशा धूसर झाली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून नेरळ-माथेरान या मार्गावरील ट्रेन मार्गाच्या देखभाल व दुरुस्तीकरिता बंद करण्यात आली होती. या मार्गावर नेरळपासून अमन लॉजपर्यंतच्या 19 किलोमीटर मार्गावर नॅरोगेजच्या रुळाखालील सर्व स्लीपर बदलण्यात येत आहेत. त्याचवेळी पावसामुळे दरडी कोसळण्याचे प्रमाण रोखण्यासाठी केली जाणारी कामे सुरु आहेत. या ठिकाणी सिमेंट स्लीपर टाकण्याची कामे प्राध्यान्याने केली जात असून दररोज मालवाहू गाडी नेरळ येथून माथेरानसाठी सोडली जाते. त्यामुळे मध्य रेल्वेच्या अधिकार्यांनी या वर्ष अखेरीस मिनी ट्रेन सुरु होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यासाठी पाच रिकामे डब्बे घेऊन चाचणीसाठी निघालेल्या मिनीट्रेनचे डब्बे घसरले. त्यावेळी मध्य रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते.
मिनीट्रेनची चाचणी घेणारी गाडी माथेरानकडे जात असताना 168 या पॉईंटवर गाडीचे डब्बे रुळावरून घसरले आणि मिनीट्रेन थांबली. तासाने पुन्हा मिनीट्रेन माथेरानकरीता रवाना झाली आणि साडेपाच वाजता माथेरान स्थानकात पोहचली. गाडीचे डब्बे रुळावरून घसरल्याने मिनीट्रेनच्या सेवेबद्दल प्रश्न निर्माण झाला आहे.