इंजिन बिघाडामुळे मिनीट्रेनचा खोळंबा

। नेरळ । वार्ताहर ।
पर्यटकांची लाडकी मिनीट्रेनची नेरळ-माथेरान-नेरळ अशी प्रवासी वाहतूक सुरु करण्याचे जोरदार प्रयत्न मध्य रेल्वे प्रशासनाने सुरु केले आहेत. त्यासाठी नॅरोगेज ट्रॅकची दुरुस्ती रेल्वे प्रशासनाकडून सुरु आहे. मात्र, ट्रॅकच्या कामासाठी आवश्यक असलेले साहित्य घेऊन गेलेल्या मालवाहू ट्रेनच्या इंजिनात बिघाड झाला. त्यामुळे ही ट्रेन नॅरोगेजवर तब्बल सहा तास थांबून होती. दरम्यान, इंजिनात बिघाड झाल्याने बंद पडलेली मालवाहू गाडी चार वाजता नेरळकरिता निघाली होती. ती गाडी रात्री 11 वाजता नेरळ स्थानकात परत आली. नेरळ माथेरान-नेरळ ही प्रवासी सेवा नॅरोगेज ट्रॅक नादुरुस्त असल्याने गेली अनेक प्रवाशांच्या सेवेत नाही. हे लक्षात घेऊन नेरळ-माथेरान नॅरोगेज मार्गावर मोठ्या प्रमाणात दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत. दुरुस्तीच्या कामासाठी लागणारे साहित्य हे नेरळ येथून दररोज मालवाहू मिनीट्रेनच्या सहाय्याने नेले जाते. गेल्या 15 दिवसांपासून मिनीट्रेनची मालवाहू सेवा सुरु असून, 6 डिसेंबर रोजी नेरळ येथून बांधकाम साहित्य घेऊन निघालेली मिनीट्रेन सायंकाळी चार वाजता माथेरान येथून नेरळ असा परतीचा प्रवास करताना बंद पडली. नॅरोगेजवर प्रवास करतानाच या मालवाहू ट्रेनच्या इंजिन एनडीएम 401 मध्ये बिघाड आला. मिनीट्रेनचे इंजिन दुरुस्त होण्यास तब्बल सहा तास लागले. एनएम 98 या ठिकाणी बंद चार वाजता बंद पडलेली मालवाहू मिनीट्रेनने नेरळ येथे आपला परतीचा प्रवास रात्री 10 वाजता सुरु केला. नेरळ-माथेरान-नेरळ मिनीट्रेन 1907 मध्ये प्रत्यक्ष सुरु झाली आणि तेव्हापासून ब्रिटिशकाळातदेखील सूर्योदयाच्या आधी आणि सूर्यास्तानंतर मिनीट्रेनचा प्रवास सुरु झालेला नाही. त्यामुळे 6 डिसेंबर रोजी बंद पडलेल्या मिनीट्रेनला रात्री नॅरोगेज ट्रकने आणले गेले, हे धोकादायक असल्याचे बोलले जात आहे.

Exit mobile version